वाई तालुक्यात वादळाचा महावितरणला मोठा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:41 AM2021-05-18T04:41:26+5:302021-05-18T04:41:26+5:30
वाई, दि. १७ : संपूर्ण देशात थैमान घातलेल्या चक्रीवादळामुळे वाई तालुक्यात महावितरणचे मोठे नुकसान झाले असून प्रचंड वेगात ...
वाई, दि. १७ : संपूर्ण देशात थैमान घातलेल्या चक्रीवादळामुळे वाई तालुक्यात महावितरणचे मोठे नुकसान झाले असून प्रचंड वेगात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मोठमोठी झाडे उन्मळून विजेच्या खांबावर पडल्याने अनेक खांब कोसळले आहेत. त्यामुळे या वादळाचा महावितरणला मोठा फटका बसला आहे, पसरणी घाटात दरडी कोसळली आहे, तर काही ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झालेला होता. बांधकाम विभागाने जेसीबी मशीनच्या साहाय्याने झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली, वादळामुळे पर्यावरणाचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे, तर विजेचे खाब कोसळल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजेचा लंपडाव चालू होता.
तालुक्यातील आठ गावांतील रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली आहेत, यामध्ये भुईंज-पाचवड रस्ता, बोपेगांव- केंजळ पसरणी- कुसगांव, पसरणी-जोर, वाई-पसरणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता, बांधकाम विभागाने त्वरित जेसीबी मशीनच्या साहाय्याने झाडे हटवून वाहतुकीचा खोळंबा होऊ दिला नाही, पसरणी घाटात बुवासाहेब मंदिराजवळ दरड कोसळली होती, ती त्वरित हटविण्यात येऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. कुसागांवमध्ये काही घरांवरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेले आहेत, चक्रीवादळामुळे दसवडीमध्ये एक पोल, बावधनमध्ये दोन पोल, जांबमध्ये दोन पोल, ओझर्डे (कदमवाडीत) दोन पोल असे एकूण आठ पोलचे नुकसान झाले आहे. वाई पोलीस स्टेशन समोर मुख्य डीपी जळाल्याने अर्धे शहर अंधारात होते, पोलवर झाडे पडल्याने लाइनच्या तारांचे मोठे नुकसान झाले आहे.