शिक्षकांच्या गावात विद्यार्थ्यांची कुचंबणा

By Admin | Published: August 30, 2015 10:04 PM2015-08-30T22:04:09+5:302015-08-30T22:04:09+5:30

स्वच्छतागृहांची दुरवस्था : शाळा, महाविद्यालयात असंतोष

The students are dumbfounded in the teachers' village | शिक्षकांच्या गावात विद्यार्थ्यांची कुचंबणा

शिक्षकांच्या गावात विद्यार्थ्यांची कुचंबणा

googlenewsNext

पाचवड : पाचवड (ता.वाई) येथील महात्मा गांधी विद्यालय व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून, शालेय व्यवस्थापन समितीचे दुर्लक्ष व स्थानिक शालेय प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. शिक्षकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पाचवडमधील विद्यालय व महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहाचीच अशी अवस्था झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाचवडमधील म. गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तसेच यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये पाचवड व आजूबाजूच्या पंधरा ते वीस गावांमधून सुमारे दोन ते तीन हजार विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. दिवंगत विठ्ठलराव गायकवाड यांच्या कल्पक नेतृत्वाने व ग्रामस्थांच्या सहकार्यातून साकारलेले महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय ही दोन्ही शाळा व कॉलेज पाचवड परिसरात अल्पावधीतच नावारुपाला आली. दोन्ही शाळा व कॉलेजची इमारत एकमेकांना लागून असलेने विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्थासुध्दा एकत्रच करण्यात आली आहे. त्यामुळे या स्वच्छतागृहाची डागडुजी व साफसफाई कोणी करायची याबाबत शाळा व दोन्ही कॉलेजमध्ये मतभेद झाले आहेत. सुमारे चार ते पाच वर्षांपासून या स्वच्छतागृहाची कसलीही डागडुजी अथवा स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्वच्छतागृहाच्या भिंती पडण्यास सुरूवात झाली आहे. तसेच त्याठिकाणी निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे परिसरातील वातावरण दूषित झाले आहे. या कारणाने स्वच्छतागृहाच्या आजूबाजूला असणाऱ्या वस्त्यांमधील लोकांचे तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या या गैरसोयीकडे शालेय व्यवस्थापन समिती व शालेय प्रशासनाने तातडीने लक्ष घालून स्वच्छतागृहांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे. (वार्ताहर)


महाविद्यालयाचे स्वच्छतागृह ओळखा!
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाचे स्वच्छतागृह नेमके कोणते, हा प्रश्न पडत आहे. ज्युनिअर कॉलेज व महाविद्यालयाच्या एकत्रित स्वच्छतागृहामुळे त्या ठिकाणी मोठ्या मुलांबरोबर लहान मुलांची हेळसांड होताना दिसून येत आहे. दरवर्षी मोठे अनुदान मिळत असूनही महाविद्यालयाच्या भोंगळ कारभाराला जबाबदार कोण, असा प्रश्न पालकांना पडला आहे.

Web Title: The students are dumbfounded in the teachers' village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.