उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतचे आव्हान संपुष्टात; सातारकरांच्या आशा मावळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 09:29 PM2022-04-06T21:29:28+5:302022-04-06T21:29:28+5:30
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर दुसऱ्या फेरीत
सातारा : महाराष्ट्र केसरीसाठी ज्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या तो २०१८ चा उपमहाराष्ट्र केसरी साताऱ्याचा किरण भगत पहिल्याच फेरीत पराभूत झाला. त्याला नवख्या पण चिवट असलेल्या गोंदियाच्या दादा उर्फ वेताळ शेळके याने ४ विरुद्ध ३ अशी मात दिली. तर दुसरीकडे २०२० चा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने नाशिककडून खेळताना मुंबईच्या आदर्श गुंड यावर ८ विरुद्ध ० गुणांनी मात करत एकतर्फी विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दणाणून हलगी कडाडली. राज्याच्या कुस्ती क्षेत्रात अतिशय मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी तमाम कुस्तीशौकिनांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. पहिल्या दिवशी डावावर पकड ठेवलेल्या मल्लांनी दुसऱ्या दिवशीही चटकदार कुस्त्या केल्या.
वजन गट आणि विजेते
५७ किलो गादी विभागात सोलापूरचा सौरभ इगवे याने बीडचा अतिश तोडकर याला दुहेरीपटावर चितपट करत सुवर्ण पदकावर नाव कोरले. अतिश तोडकरला रौप्य तर कोल्हापूरच्या अतुल चेचकर याला कास्यंपदक मिळाले.
५७ किलो माती विभागात सोलापूरचा जोतिबा अटकले याने पुण्याचा अमोल वालुगडे याच्यावर ७ विरुद्ध ३ अशी मात करत सुवर्ण पदक पटकावले. अमोल वालुगडे रौप्य तर अक्षय डेरे याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
७० किलो गादी विभागात कोल्हापूरचा सोनबा गोंगने याने मुंबईच्या सर्वेश यादव याच्यावर २- १ ने मात करत आस्मान दाखवले. गोंगाने याने सुवर्णपदावर नाव कोरले तर सर्वेश यादव रौप्य व सोलापूरचा रविराज चव्हाण व पिंपरी चिंचवडचा परशुराम कॅम्प यांना कांस्य पदक मिळाले.
७० किलो माती विभागात पुण्याच्या निखिल कदम याने सोलापूरचा संतोष गावडे याला ७ - ३ ने चितपट करत सुवर्ण पदकावर नाव कोरले. तर संतोष गावडेला रौप्य तर कोल्हापूरच्या निलेश हिरगडेला कांस्य पदक मिळाले.
९२ किलो गादी विभागात वर्ध्याच्या उदयसिंह खांडेकरवर भारंदाज या डावाने कोल्हापूरच्या सुशांत तांबोळकर याने विजय मिळवत सुवर्ण पटकावले. उदयसिंहला रौप्यवर समाधान मानावे लागले. अहमदनगरच्या केवल भिंगारे याने सातारच्या अजय थोरातला चारीमुंडया चीत करत कांस्य पदक मिळविले.
९२ किलो माती विभागात बीडच्या अमोल गुंडने दुहेरी पट डावावर अमरावतीच्या प्रशांत जगतापला १० -० अशी एकतर्फी मात देत सुवर्ण पदक मिळवले. प्रशांतला रौप्य तर मुंबईच्या सारंग सोनटक्केला कांस्यपदक मिळाले.