साखरपुडा, विवाह ऑनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:25 AM2021-06-23T04:25:45+5:302021-06-23T04:25:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने विवाह सोहळे तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने विवाह सोहळे तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून साखरपुडा, विवाहसोहळे ऑनलाइन आयोजित केले जात आहे. मात्र एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या तेराव्याला मोजकीच मंडळी उपस्थित राहून विधी पूर्ण करीत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्या काही महिन्यांपासून अनेकांनी विवाह सोहळे रद्द केले. मात्र, ठराविक लग्नसोहळे आयोजित केले जात असले तरी उपस्थितीची मर्यादा पाळण्यात येत आहे. शिवाय मास्क, सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सिंग राखले जात आहे. ज्या नागरिकांना विवाह सोहळ्याला उपस्थिती लावता येत नाही, अशा व्यक्ती व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उभयतांना आशीर्वाद देत आहेत. साखरपुड्याच्या बाबतीतही हीच पद्धत अवलंबली जात आहे.
दरम्यान, मंदिरे बंद असल्यामुळे लघुरूद्र, अभिषेकसारखे धार्मिक कार्यक्रमही सध्या बंदच आहेत. श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात येत असली तरी महाप्रसाद ठेवला जात नाही. पूजेला नमस्कार करण्यासाठीही सहसा लोकांना बोलावले जात नाही. घरातील मंडळींमध्येच कार्यक्रम उरकण्यावर भर दिला जात आहे. मृत व्यक्तीचे दहावे, बारावे व तेरावे भटजींना बोलावून उरकण्यात येत असले तरी अगदी जवळच्या नातेवाईकांशिवाय अन्य कोणालाही बोलावणे टाळले जात आहे.
(चौकट)
सत्यनारायण पूजा ऑनलाइन
कोरोनामुळे धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिल्यास गर्दी होऊन कोरोना संक्रमण वाढीचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे स्वत: नागरिकही सतर्क झाले आहेत. त्यामुळे सत्यनारायण पूजा, गणेशपूजन किंवा वास्तुशांती पूजा ऑनलाइन आयोजित केली जात आहे.
(चौकट)
पूजेला आले तरी मास्क
- शासन नियमांचे नागरिकांकडून पुरेपूर पालन केले जात आहे.
- पूजेला बसणारे यजमान व पूजा सांगणारे भटजी मास्क परिधान करत आहेत.
- मोजक्या चार ते पाच लोकांमध्ये पूजा उरकण्यात येत आहे.
- पूजेला बाहेरून आलेल्या व्यक्तीच्या हातावर आधी सॅनिटायझर दिले जात आहे.
(कोट)
कोरोनामुळे मंदिरे बंद आहेत. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमांचे प्रमाणही आता कमी झाले आहे. ज्या ठिकाणी पूजा आयोजित केली जात आहे, तेथे शासन नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. आम्हीदेखील सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन करीत आहेत.
- विशाल गुरव, सातारा
(कोट)
कोरोनाचे संक्रमण वाढल्याने वास्तुशांती, गणेशपूजन किंवा सत्यनारायण पूजेचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच मृत व्यक्तीचे बारावे-तेरावे मात्र एकाच दिवशी उरकण्यात येत आहे. मात्र, या विधीसाठी मोजक्याच व्यक्ती उपस्थित राहत आहेत.
- नारायण शहाणे, सातारा