विश्वास नांगरे-पाटील यांनी माझ्यावरचा राग शांतिदूतवर काढला, सुरेश खोपडे यांचा सनसनाटी आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 04:08 PM2018-02-12T16:08:10+5:302018-02-12T16:19:39+5:30
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने लेख लिहून पोलीस खात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करीत सुधारणा सूचवल्या होत्या. तसेच सातत्याने नोकरशाहीविरुद्ध आवाज उठवल्याने विश्वास नांगरे-पाटील यांना राग आला. त्यामुळेच त्यांनी परिवर्तनाचे प्रतीक असलेला शांतिदूत पक्ष्याचा पुतळा हटविला आहे, असा आरोप निवृत्त सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
सातारा : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने लेख लिहून पोलीस खात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करीत सुधारणा सूचवल्या होत्या. तसेच सातत्याने नोकरशाहीविरुद्ध आवाज उठवल्याने विश्वास नांगरे-पाटील यांना राग आला. त्यामुळेच त्यांनी परिवर्तनाचे प्रतीक असलेला शांतिदूत पक्ष्याचा पुतळा हटविला आहे, असा आरोप निवृत्त सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, शांतिदूत हटवण्यासाठी पोलिसांना दोन वेळा घुमजाव करणे, म्हणजे प्रशासकीय बाब असूच शकत नाही. प्रशासकीय बाब म्हणजे जनतेच्या हिताचा निर्णय होय. पुतळा हटवण्यात जनतेचे हित नसून नांगरे-पाटील यांचा अहंकार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने शांतिदूत हटवण्याचे संयुक्तिक कारण द्यावे, अन्यथा त्याच ठिकाणी पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी केली.
सातारा जिल्हा पोलीस मुख्यालयासमोरील असलेला शांतिदूत पुतळा गुरुवारी रात्री अचानक पोलिसांनी हटविला. या पार्श्वभूमीवर सुरेश खोपडे यांनी सोमवारी साताऱ्यांत येऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षा देशपांडे, नरेंद्र पाटील, विजय मांडके उपस्थित होते.
खोपडे म्हणाले, मुख्यालयासमोर पूर्वी चार तोफा होत्या. त्या पाहिल्यानंतर सामान्य माणसाच्या मनात दडपण येत होते. त्यामुळे मुख्यालयात येण्यासाठी लोकांना भीती वाटत होती. ही परिस्थिती बदलून पोलीस कल्याण निधी आणि कार्यालयीन खर्चातून रिकाम्या पुंगळ्या वितळवून शांतिदूत पुतळा उभारण्यात आला होता.
हे सामान्य आणि पीडित लोकांच्या रक्षणाचे प्रतीक होते. मी सातत्याने प्रशासनातील बदलावर बोलत असल्याने नोकरशाहीला असे बदल नको आहेत. त्यामुळे मला आणि मी मांडत असलेला परिवर्तनाचा विचार दाबण्यासाठी अशी प्रतिके हटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.