वाई : कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी, व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व छोटे-मोठे व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यामधून शेती क्षेत्र व अत्यावश्यक सेवेशी निगडित व्यवसाय वगळण्यात आले आहेत. एकंदरीत कोरोनाच्या दुष्टचक्रात सर्व जनता भरडली जात आहे.
वाई तालुक्यात बागायत शेतीचा भाग असून तालुक्याची भाग्यरेषा असणारी कृष्णानदी मधून गेली आहे. धोम धरणाचा डावा व उजवा कालवाही तालुक्यातून गेला आहे. यामुळे बागायती शेतीबरोबर शेतकरी विविध प्रकारची फळ उत्पादनेही मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. शेतकरी बांधावर, रस्त्याच्या कडेला, पडीक जागेत, ओढ्याच्या-नदीच्या कडेला चिंचेची झाडे लावत असतात. चिंचेच्या झाडाचे आयुष्यमान जास्त असल्यामुळे एकदा तयार झालेले झाड पिढ्यानपिढ्या उत्पन्न मिळवून देत असते. वाई तुलक्यातही मोठ्या प्रमाणावर चिंचेची झाडे आहेत. व्यापारी शेतकऱ्याकडून उक्ती झाडे घेत असतात. मग झोडणी व फोडणीला मजूर लावले जातात. चिंचेचा दैनंदिन अनेक गोष्टीमध्ये उपयोग होत असल्यामुळे चांगला भाव मिळत असतो. त्याचबरोबर स्थानिकांना रोजगारही मिळत असतो.
चौकट :
चिंचेची झाडे तयार केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. सध्या फोडलेल्या चिंचेला शंभर रुपये तर न फोडलेल्या चिंचेला ३५ रुपये दर आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर कडक निर्बंध असल्यामुळे बाजार बंद असल्यामुळे माल तयार असून विकणे कठीण झाले आहे.
- चंद्रकांत शिर्के,
शेतकरी नावेचीवाडी वाई.