फलटण - ‘आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी जावळी तालुक्यातील जमिनी कोणी लाटल्या? याचे उत्तर द्यावे, तुम्हाला मताधिक्क्य कमी भेटले म्हणून आमच्यावर राग काढू नका आणि अशा खासदार उदयनराजेंना पक्ष सांभाळणार असेल तर पक्षातून बाहेर पडण्याची परवानगी खासदार शरद पवार यांनी आम्हाला द्यावी,’ असा इशारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला आहे.
नीरा-देवघरच्या पाण्यावरून उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जयकुमार गोरे यांनी केलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रामराजे बोलत होते. रामराजे म्हणाले, ‘पुनर्वसनाच्या जमिनींबाबत आपल्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असून, ते आरोप उदयनराजेंनी सिद्ध करावेत. उदयनराजेंनी महसूल राज्यमंत्री असताना काय उद्योग केलेत, हे बाहेर काढणार आहे. माझ्यावर बोलणारे दोन खासदार आणि एक आमदार तिघेही यापूर्वी एकत्र होतेच, पूर्वी टेबलाखालून होते, आत्ता टेबलावर आले आहेत, मी त्यांना भीत नाही. असले बरेच आमदार-खासदार उरावर घेतले असून, दोन्ही खासदारांना मी काखेत घेऊन फिरणारा आहे. माझ्यावर पुनर्वसनाच्या जमिनी लाटल्याचा आरोप करणाऱ्या गोरेंनी पनवेलजवळील जमिनीचे काय केले, हे पाहावे.’
दरम्यान, उदयनराजे, रणजितसिंह आणि जयकुमार हे तिघे पिसाळलेली कुत्री आहेत, अशी जहरी टीकाही रामराजेंनी यावेळी केली. नीरा उजवा कालव्यातून फलटण तालुक्यातील ३६, माळशिरस तालुक्यातील १७ आणि पंढरपूर तालुक्यातील काही गावांना गेल्या १२ वर्षांपासून पाणी दिले जात होते. मात्र, शासनाने दि. १२ जून रोजी घेतलेल्या निर्णयामुळे आता या बागायती पट्ट्यातील गावांना मिळणारे नीरा-देवघरचे पाणी बंद होणार आहे, अशी चिंताही रामराजेंनी व्यक्त केली.
रामराजेंचे वाढते वय हे त्यांच्या चीडचीड करण्यामागचे कारण आहे. या वयात मेंदूवरील ताबा सुटतो. त्यामुळे त्यांनी वाढत्या वयाचा विचार करून राजकीय संन्यास घ्यावा. आम्ही पिसाळलेली कुत्री आहोत, तर होय. आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी पिसाळलेलो आहोत.
- आमदार जयकुमार गोरे
रामराजे, आपण अनेक वर्षे जलसंपदा खात्याचे मंत्री होता, तेव्हा बारामतीला पाणी देताना आपल्याला लाज का वाटली नाही? नीरा देवघरचे पाणी पुन्हा बारामतीला देण्यासाठी शासनाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार आहात. रामराजेंच्या या कृतीचा खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला तालुक्यांतील जनतेच्या वतीने मी निषेध करतो.
- खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर