जिल्ह्यातील सहा तालुक्यात पाण्यासाठी धावू लागले टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:40 AM2021-05-12T04:40:07+5:302021-05-12T04:40:07+5:30
सातारा : जिल्ह्यात सलग दोन वर्षे दमदार पाऊस झाला तसेच जलसंधारणाच्या कामामुळे पाणीसाठे टिकून राहत असल्याने यंदा मार्च महिन्याच्या ...
सातारा : जिल्ह्यात सलग दोन वर्षे दमदार पाऊस झाला तसेच जलसंधारणाच्या कामामुळे पाणीसाठे टिकून राहत असल्याने यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात टँकर सुरू झाला असला तरी टंचाई वाढू लागली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील सहा तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, १७ गावे आणि २३ वाड्यांतील १४ हजारांवर नागरिक अवलंबून आहेत. यामध्ये माणमध्ये अधिक टंचाई आहे.
जिल्ह्यात तीन-चार वर्षातून दुष्काळ पडतो. त्यातच पाऊस होऊनही माण, खटावसारख्या तालुक्यात डिसेंबर, जानेवारी महिना उजाडताच टँकर सुरू करावे लागायचे. पण, गेल्या काही वर्षात हे चित्र बदललंय. याला कारण म्हणजे जलसंधारणाची झालेली कामे. त्याचबरोबर वॉटर कप स्पर्धेमुळे तर पाणी साठवण्याचं तुफान आलेलं. माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यात जलसंधारणाची मोठी कामे झाली आहेत. त्यामुळे पावसाचं पडलेलं पाणी अडून राहिलं व त्याचा फायदाही टंचाई निवारणासाठी झाला आहे.
जिल्ह्यात दोन वर्षांपासून दमदार पाऊस होत आहे. २०१९ आणि २०२० या दोन वर्षांत सरासरीहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात टंचाईची स्थिती एकदम कमी राहणार असल्याचे समोर येऊ लागले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने संभाव्य टंचाई आराखडा तयार केला आहे. ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील १६९ गावांना आणि २२६ वाड्यांत टंचाई भासू शकते. पण यामधील १३८ गावांनाच टंचाईचा सामना करावा लागण्याचा अंदाज आहे. यासाठी ४६ टँकर लागू शकतात. त्यासाठी जवळपास अडीच कोटीचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, उन्हाळा संपत आलातरी अजूनही मोठ्या प्रमाणात टँकर सुरू नाहीत.
गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यातील पहिला टँकर खटाव तालुक्यात सुरू झाला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर तालुक्यात टंचाई निवारणासाठी उपाययोजना राबविण्यात आल्या; मात्र, यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत टँकर उशिरा सुरू झाला आहे. वाई तालुक्यातील दोन गावे आणि तीन वाड्यांसाठी प्रथम टँकर सुरू झाला. आतातर जिल्ह्यातील सहा तालुक्यात टँकर सुरू झाला आहे. या सहा तालुक्यांतील १७ गावे आणि २३ वाड्यांवरील लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी १२ टँकर सुरू आहेत. तसेच पाणीपुरवठ्यासाठी १९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
चौकट :
वाई, माण, पाटण तालुक्यात टँकर...
वाई तालुक्यातील तीन गावे आणि दोन वाड्यांसाठी दोन टँकर सुरू आहेत. यावर २९३१ नागरिक आणि १००५ पशुधन अवलंबून आहे. माण तालुक्यात सहा गावे आणि १४ वाड्या तहानल्या आहेत. यासाठी दोन टँकर मंजूर आहे. तालुक्यातील ४८६३ लोकसंख्या बाधित झाली आहे. पाटण तालुक्यातील दोन वाड्यांसाठी टँकर सुरू आहेत. त्याचबरोबर कऱ्हाड तालुक्यात दोन गावांसाठी, सातारा तालुक्यात १ गाव व ४ वाड्या आणि महाबळेश्वर तालुक्यातील दोन गावांसाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला आहे. या सहा तालुक्यातील १४,५७५ नागरिक आणि ४४४८ पशुधन टँकरवर अवलंबून आहेत.