टार्गेट २३ लाख; ४० लाख रोपे तयार! हरित साताऱ्याकडे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 08:36 PM2018-06-14T20:36:17+5:302018-06-14T20:36:17+5:30
राज्य शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात सातारा जिल्ह्याला २३ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, सद्य:स्थितीत वनविभागाकडे २५ लाख व इतर विभागांची मिळून सुमारे ४० लाख झाडे तयार आहेत
नितीन काळेल
सातारा : राज्य शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात सातारा जिल्ह्याला २३ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, सद्य:स्थितीत वनविभागाकडे २५ लाख व इतर विभागांची मिळून सुमारे ४० लाख झाडे तयार आहेत. त्यामुळे यावर्षीही जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक काम होणार आहे. तर दुसरीकडे वन विभागाकडील झाडे जगण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक असून, उन्हाळ्यात टँकरने झाडांना पाणी घालण्यात आले होते.
राज्य शासनाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. पहिल्या २०१७ यावर्षी राज्यात ४ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यामध्ये सातारा जिल्ह्याला ७ लाख ६३ हजार वृक्ष लागवडीचे तर वन विभागाला ४ लाख ७८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात वनविभागाने ५ लाख ३९ हजार झाडे लावली. यावर्षी जिल्ह्यात २३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, वन विभागाला त्यापैकी १३ लाख २५ झाडे लावायची आहेत. असे असलेतरी प्रत्यक्षात वनविभागाने १६ लाख झाडांचे नियोजन केले आहे.
१ ते ३१ जुलै असा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम असून, सद्य:स्थितीत वन विभागाकडे सध्या २५ लाख रोपे तयार आहेत. तर सामाजिक वनीकरण विभाग व कृषी विभागाकडेही रोपे तयार असून, हा आकडा ४० लाखांवर जाणारा आहे. त्यामुळे दुसºया वर्षीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणार आहे. त्यादृष्टीने वनविभाग व इतर विभागांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.
२८ नर्सरीच्या ठिकाणी रोप निर्मिती...
वनविभागाच्या जिल्'ात २८ नर्सरी आहेत. त्यामध्ये रोपे तयार करण्यात आली आहेत. लिंब, शिसव, बाभूळ, खैर, कवठ, जांभूळ, आपटा, उंबर, गुलमोहर, चाफा, फणस, चिंच, गूळभेंडी, काशीद, हिवर, सीताफळ, वड, पिंपळ आदी रोपांची निर्मिती करण्यात आली आहे.
पाच लाखांवर रोपे जगली...
गेल्यावर्षी वन विभागाने त्यांच्या हद्दीत ५ लाख ३९ हजार रोपे लावली होती. त्यामधील ५ लाख २० हजारांवर रोपे आॅक्टोबरअखेर जगली होती. तर उन्हाळ्यात आवश्यक त्या ठिकाणच्या रोपांना पाणी देण्यात येऊन ती जगविण्यात आली. त्यामुळे गेल्यावर्षी लावण्यात आलेली ९० टक्क्यांच्यावर रोपे वनविभागाने जगविली आहेत.
- जिल्'ातील वनविभागाचे एकूण क्षेत्र १ लाख १८ हजार १७४ हेक्टर
- सर्वात अधिक क्षेत्र महाबळेश्वर तालुका
- पाटण तालुक्यातही मोठ्या प्रमाणात क्षेत्र
- यावर्षीच्या लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम पूर्णत्वाकडे
- यावर्षी वनविभागाच्या १०७ जागेवर वृक्षारोपणाचे नियोजन
- १६०० हेक्टर क्षेत्रावर झाडे लावण्यात येणार
जुलैपासून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. यावर्षी वन विभागाच्या १०७ ठिकाणावर ही झाडे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी खड्डेही खोदण्यात आले आहेत. विविध संस्था, शाळांचा या लागवडीत सहभाग घेणार आहे.
- अनिल अंजनकर, उपवनसंरक्ष वनविभाग