ताथवडे घाट; दरडींची वाट! अपघाताचा धोका : उपाययोजनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 05:20 PM2020-10-10T17:20:51+5:302020-10-10T17:22:39+5:30
landslides, sataranews, roadsafety फलटण तालुक्यातील ताथवडे घाटात सध्या दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच या घाटातून प्रवास करावा लागत आहे.
वाठार निंबाळकर : फलटण तालुक्यातील ताथवडे घाटात सध्या दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच या घाटातून प्रवास करावा लागत आहे.
फलटण-पुसेगाव रस्त्यावरील ताथवडे या सुमारे चार किलोमीटरच्या घाट रस्त्यावर डोंगरावरून मोठ-मोठे दगड निसटून रस्त्यावर येत आहेत. सध्या या रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरणाचे काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहे.
रस्ता दुरुस्ती होत असल्याने वाहनचालक व परिसरातील ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत असले तरी ज्या-ज्या ठिकाणी घाटात दरडी कोसळण्याची शक्यता आहे असे दगड काढून टाकण्यात यावेत अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो.
पाऊस पडताच अचानक मोठे दगड डोंगर उतारावरून रस्त्यावर कोसळत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याबरोबरच दरडी कोसळून वाहतूक बंद होत आहे. त्यामुळे प्लॅस्टर अथवा लोखंडी जाळी लावून उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी ताथवडे येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद जाधव यांनी केली आहे.