सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून, २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ६१ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर जूनपासून आतापर्यंत ९८५ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. तर कोयना धरणात आठ दिवसांत जवळपास साडेचार टीएमसी पाणीवाढ झालेली आहे.जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस दाखल होतो. त्यानंतर खरीप पेरण्यांना सुरुवात होते. यंदा मात्र, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. तरीही अद्याप जोरदार पाऊस पडलेला नाही. २५ जूनपासून पश्चिम भागात पाऊस होत आहे. कोयना, नवजा, तापोळा, बामणोली, महाबळेश्वर, कांदाटी खोऱ्यात पाऊस पडत आहे. तरीही दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झालेला आहे.मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २९ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. तर नवजा येथे ३७ आणि महाबळेश्वरला ६१ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. तर १ जूनपासून कोयनानगर येथे ६०४ आणि नवजाला ८५१ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ८ हजार ९६५ क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर पायथा वीजगृहातील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी अशी प्रमुख धरणे आहेत. या धरणक्षेत्रातही पाऊस पडत आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढत चालला आहे. तरीही धरणे भरण्यासाठी अजूनही मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. तरच जुलैअखेरपर्यंत तरी छोटी धरणे भरू शकतात. कोयना धरण भरण्यास वेळ लागू शकतो.साताऱ्यात ऊन-पावसाचा खेळ...सातारा शहरात दोन दिवसांपासून पाऊस कमी झाला आहे. तसेच ऊन-पावसाचाही खेळ सुरू आहे. त्यामुळे सहा दिवसांनंतर सातारकरांना सूर्यदर्शन घडले. तर मंगळवारी सकाळी पावसाची उघडीप होती. दुपारनंतर काही प्रमाणात पाऊस पडला.
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात आठ दिवसात झाली 'इतकी' वाढ
By नितीन काळेल | Published: July 04, 2023 6:25 PM