Satara- थकबाकीदारांची नावे फलकावर झळकणार, रहिमतपूर पालिका ॲक्शन मोडवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 02:19 PM2023-03-31T14:19:22+5:302023-03-31T14:19:37+5:30
कर भरणा करा अन् फ्लेक्सवरील नावे टाळा..
जयदीप जाधव
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगरपरिषदेने करवसुलीसाठी सातत्याने मोहीम राबविली आहे. तरीही अद्याप बत्तीस टक्के थकबाकी असल्याने नाईलाजाने पालिका प्रशासनाने थकबाकीदारांची नावे फ्लेक्स बोर्डवर लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या चार दिवसांत थकबाकीदारांची नावे चौकामध्ये फ्लेक्स बोर्डवर झळकणार आहेत.
रहिमतपूर पालिका प्रशासनाने घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी आठ वसुली पथकांच्या माध्यमातून जोरदार वसुली मोहीम राबवली. वसुलीदरम्यान कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकी दारावर वेळोवेळी कारवाईचा दंडुका उगारला. वसुली मोहिमेदरम्यान तब्बल १३० नळ कनेक्शन तोडण्यात आली असून, सुमारे १२५ मिळकतदारांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. नोटिसा मिळाल्यानंतर काही थकबाकीदारांनी पूर्ण थकीत रकमेचा भरणा केला असून, काहींनी थकित रकमेपैकी काही रक्कम भरल्यामुळे जप्तीची कारवाई करण्यात आली नाही.
२९ मार्चअखेर पालिकेची ६८ टक्के कर वसुली झाली आहे. पालिकेच्या घरपट्टी पाणीपट्टीच्या एकूण तीन कोटी ६९ लाख ९ हजार रुपये करापैकी सुमारे दोन कोटी ४२ लाख ५७ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. परंतु सुमारे एक कोटी २७ लाख ६१ हजार रुपये अद्याप येणे बाकी आहे. म्हणजेच अद्याप बत्तीस टक्के करवसुली बाकी आहे.
रहिमतपूर शहराच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यासाठी कर वसुली शंभर टक्के असणे गरजेचे आहे. परंतु सातत्याने थकित कराची मागणी करूनही थकबाकीदार जुमानत नसल्यामुळे नाईलाजाने थकबाकीदारांची नावे फ्लेक्सवर प्रसिद्ध करण्याबाबतचा निर्णय पालिका प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. हे फ्लेक्स गावातील चौकाचौकांमध्ये ठेवले जाणार आहेत.
कर भरणा करा अन् फ्लेक्सवरील नावे टाळा..
रहिमतपूरच्या चौकामध्ये लावलेल्या फ्लेक्सच्या माध्यमातून मिळकतदारांची सर्वांसमोर जाहीर होणारी नावे रोखण्यासाठी थकबाकीदारांनी तातडीने विनाविलंब कर भरणा पालिकेमध्ये करावा, अन्यथा पालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या चार दिवसांत केली जाणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी तथा प्रशासक संजीवनी दळवी यांनी दिला आहे.