योग्यवेळी जागा अन् उमेदवारांची घोषणा होणार, पृश्वीराज चव्हाणांनी दिली माहिती
By नितीन काळेल | Published: March 6, 2024 03:33 PM2024-03-06T15:33:20+5:302024-03-06T15:34:05+5:30
लोकसभेची निवडणूक 'या' चार मुद्यांवर लढणार, विजयाची खात्री नसल्याने फोडाफोडीचे राजकारण
सातारा : भाजप आणि मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात एकत्र आलो असून महाराष्ट्रात विजयाची खात्री नसल्यानेच त्यांच्याकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे तीन पक्षांच्या बैठकीत उमेदवार ठरेल त्याला विजयी करणार आहे. यासाठी योग्यवेळी जागांची आणि उमेदवारांचीही घोषणा होईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांनी दिली.
सातारा येथील काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि विविध संघटनांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सतेज पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे डाॅ. भारत पाटणकर, लक्ष्मण माने, अॅड. वर्षा देशपांडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरचिटणीस राजकुमार पाटील, उदयसिंह पाटील, रणजितसिंह देशमुख आदी उपस्थित होते.
संविधान बदलण्याचा प्रयत्न
माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण म्हणाले, आताच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ३७० पार खासदाराचा नारा दिला आहे. याचा अर्थ संविधान बदलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर लोकशाही संपुष्टात आणून विरोधी पक्षांनाही संपविण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात तर मराठा समाज आणि ओबीसीत भांडणे लावली आहेत. हे सर्व मनुवादी कारस्थान आहे. या निवडणुकीत विजयाची खात्री नसल्यानेच त्यांच्याकडून पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. देशातील लाेकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी लोकांनीच ही निवडणूक हाती घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत वंचित आघाडीलाही बरोबर घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
माजी मंत्री शशिकांत शिंदे म्हणाले, ३ फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक राष्ट्रवादी भवनमध्ये झाली. त्यानंतर काँग्रेस कमिटीत ही बैठक पार पडली. इंडिया आघाडी मजबूत असून सर्वांत भाजपविरोधात लढण्याची जिद्द आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा वारसा आणि त्यांचे विचार बदलण्याचा प्रयत्न होत आहे. पण, आम्ही तसे होऊ देणार नाही. यशवंतराव चव्हाण यांचे विचार जीवंत ठेवण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. यासाठीच ही बैठक झाली. साताऱ्यात ३८ पक्ष आणि संघटना एकत्र आल्या असून आम्ही आता विजयी होऊनच दाखवू.
प्रा. बानुगडे पाटील यांनीही भाजपवर ताेंडसुख घेतले. तसेच २०२४ ची निवडणूक भारताची दिशा ठरवणारी आणि संविधान वाचविणारी आहे. ही निवडणूक स्वातंत्र्यांची दुसरी लढाई आहे. यासाठी आम्ही सर्वजण एकत्र निवडणूक लढवतोय, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर डाॅ. पाटणकर यांनी जातीयवादी शक्ती आणि हुकुमशाही आणणाऱ्याविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत, असे सांगितले.
८ मार्चला कऱ्हाडला बैठक..
महाविकास आघाडीतील पक्ष आणि प्रमुख संघटनांची पुढील बैठक दि. ८ मार्चला कऱ्हाडला घेण्यात येणार आहे. या बैठकीत निवडणुकीची पुढील रणनिती ठरविण्यात येणार आहे. तसेच आघाडीतील प्रमुख तीन पक्षाची बैठक मुंबईत होत आहे. यामध्ये राज्यातील जागा वाटपावर अंतिम चर्चा होईल, असेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
लोकसभेची निवडणूक चार मुद्यांवर..
आताची लोकसभा निवडणूक ही चार मुद्यांवर लढणार आहे. महागाई, शेतकरी प्रश्न, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे प्रमुख चार मुद्दे असतील, असेही माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.