सगळं पावसानं केलं म्हणता.. पण लोकांसाठी पाऊस पडला पाहिजे; उदयनराजेंच्या प्रचाराच्या किश्श्यांनी सर्व जण लोटपोट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 03:15 PM2024-04-05T15:15:26+5:302024-04-05T15:15:42+5:30
सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या वेगळ्या आणि हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा मूड कधी तयार होईल आणि ...
सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या वेगळ्या आणि हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा मूड कधी तयार होईल आणि ते काय ॲक्शन करतील, याचा काही नेम नसतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर- पाचगणी दौऱ्यात पत्रकारांच्या प्रश्नांना अशीच हटके स्टाइलने उत्तरे देत त्यांनी सर्वांना हसून लोटपोट केले.
खासदार उदयनराजे भोसले हे सध्या राजकीय दौऱ्यासाठी सकाळी ७:३० वाजताच जलमंदिर सोडतात. दिवसभर ते जिल्ह्याच्या विविध भागांत फिरत आहेत. गुरुवारी त्यांचा महाबळेश्वर आणि पाचगणी दौरा होता. यावेळी पत्रकारांनी त्यांना गाठले आणि काही प्रश्न विचारले. त्यांना आपल्या स्टाइलने उत्तर देत त्यांनी सुरुवातच धमाकेदार केली.
प्रश्न : दौऱ्यात लोकांचा प्रतिसाद कसा आहे?
उत्तर : तुम्ही जो प्रश्न विचारला ना मला दौऱ्याचा... त्यावरून तुमचे पुढचे प्रश्न काय असतील, याचा विचार करून मला गुंगी आली. दौऱ्यात काय नेहमीप्रमाणे लोकांच्या भेटीगाठी सुरू आहेत. लपवून काय ठेवायचे. पहिलेच सांगितले उभा राहणार म्हणजे राहणार. जे काही असेल ते बघू नंतर.
प्रश्न : लोकांचा प्रतिसाद कसा आहे?
उत्तर : तुम्हीच सांगा... कसा आहे. चांगला आहे ना... मग मला कशाला विचारताय...?
प्रश्न : तुमच्या विरोधात एक प्रबळ उमेदवार उतरविण्याचा विचार महाविकास आघाडी आणि शरद पवार करत आहेत?
उत्तर : आजपर्यंत कधीही राजकारण केले नाही. केले तर संपूर्ण समाजकारण. लोकहिताची कामे केली. आढेवेढे घेतले नाहीत. कोणाला दुखवले नाही. लोकांचे प्रेम आहे. लोक ठरवतील काय करायचे ते. शेवटी ते लोकशाहीतील राजे आहेत.
प्रश्न : पक्षाकडून उमेदवारी कधी जाहीर होईल?
उत्तर : आता इथं काय आहे... इथं आत गेल्यानंतर सगळे पक्षी बघितले. ते पक्षी काय ठरवताहेत ते विचारतो त्यांना. ते तर माझ्याबरोबर आहेत, बाकी मला काही माहिती नाही.
प्रश्न : चिन्ह जाहीर नाही... पण त्याच चिन्हावर जिल्हा पिंजून काढताय. अचानक घात होऊ शकतो का? वरून काही संकेत आहेत का?
उत्तर : वरून म्हणजे कोठून... इतक्यात वरती बोलवू नका. जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत लोकांची सेवा करत राहणार. बाकी काय?
प्रश्न : शरद पवार यांनी कॉलर उडवून आव्हान दिले, असे म्हटले जाते?
उत्तर : त्यांना काय बोलणार... ते वडीलधारे आहेत. अहो माझं बारसं जेवलेत ते. त्यांच्याबाबत मी काय बोलणार.
प्रश्न : पण, कॉलर उडवायची स्टाइल उदयनराजेंची दुसऱ्यांना ती कशी जमणार?
उत्तर : अहो, मला सांगा. काय झालं. मी कासला गेलो होतो. घाटाई देवीची यात्रा होती. दर्शनासाठी गेलो. त्यावेळी कोणी म्हटले रजनीकांतची स्टाइल गॉगलची आहे. तुमची काय स्टाइल आहे. नाही आपली काही स्टाइल नाही. आपण काय कोणाचे वाईट केले नाही. लोकांच्या हिताचेच काम केले आहे. मग म्हटले काय काय करायचे. काय तरी केले पाहिजे. कोणी पण काहीही सांगू देत, केव्हाही तयार आहे. मग कॉलर उडविली आणि ती स्टाइल झाली. कॉलर आता घातली. माझे काही काढून घ्या; पण लोकांचा जीव आहे माझ्यावर, तो कोणी काढून घेऊ शकत नाही.
प्रश्न : पेहराव आता बदललाय तुमचा..?
उत्तर : अगोदर मी कुर्ता-पायजमा घालायचो... लोकांना वाटायचे लयं मोठ्या बापाचं पोरंग दिसतंय. पँट, शर्ट घातले तर वाटते लय सोफिस्टीकेटेट झाले. टेक्नॉक्रेट. आता विचार केला लंगोट तर घालून जाऊ शकत नाही. काय करायचे अंग तर झाकले पाहिजे. हे बरे वाटते. गर्मीच्या दिवसातही कपडे बरे वाटतात.
प्रश्न : राजकारणाच्या रेसिंगमध्ये कोणत्या गाड्या धावताहेत ?
उत्तर : मला माझी फक्त गाडी माहिती आहे... इतरांच्या कोणाच्या गाड्या धावणार माहिती नाही. शेवटी प्रत्येकाला इच्छाशक्ती आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या फिरवाव्यात.
प्रश्न : शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्यापैकी जास्त मैत्रीचे संबंध कोणाबरोबर?
उत्तर : सगळ्यांबरोबरच... वैचारिक मतभेद असू शकतात. कदाचित माझे चुकीचे असेल त्यांचे बरोबर असेल. पण, त्यांचे विचार त्यांच्याजवळ माझे माझ्याजवळ. आपण चर्चेतून मार्ग काढू शकतो. कोणाला कमी लेखायचा विषयच येत नाही. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी योग्य आहे. श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे ही सर्व मित्रमंडळी आहेत. श्रीनिवास पाटील साहेब तर आमच्या वडिलांचे खास. त्यांनी मला एकदा दिल्लीत सांगितले. तुमच्या बारशाला मी होतो. तेव्हा तुम्ही पाळण्यात होता. त्यांचा आशीर्वाद निश्चित अपेक्षित आहे. ज्यांना उभे राहायचे आहे, त्यांना राहू देत. पण, तुम्ही सगळे म्हणता ना पावसामुळे सगळं झालं. देवाची कृपादृष्टी आहे. पण मला वाटते पाऊस पडावा. कारण ही निवडणूक वगैरे सोडून द्या. लोकांचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे तो आहे पाण्याचा...