Satara News: घाटाई देवीच्या यात्रेसाठी भक्तांची अलोट गर्दी, हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी
By दीपक शिंदे | Published: January 11, 2023 02:03 PM2023-01-11T14:03:56+5:302023-01-11T14:04:20+5:30
जादा एसटी बसेसची सोय
पेट्री : घाटवण (ता. सातारा) येथील श्रीघाटाई देवीची यात्रा सालाबादप्रमाणे पौष कृष्ण संकष्टी चतुर्थीला भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील असंख्य भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. नवस फेडण्यासाठी संपूर्ण परिसर नारळ, हार, तुरे, फुले, गुलाल, खोबऱ्याने नटून देवीच्या मंदिरावर रोषणाई केली होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राजू भोसले यांनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत मंदिराला प्रदक्षिणा घातल्या.
लाखो भाविकांची कुलस्वामिनी, नवसाला पावणारी, स्वयंभू देवस्थान घाटाईदेवीच्या दोन दिवसांच्या यात्रेत पहिल्या दिवशी काकड आरती, अभ्यंगस्नान, अभिषेक, वस्त्रालंकार, देवीचे दर्शन कार्यक्रम उत्साहात झाले. सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई विविध ठिकाणांहून भाविक देवीच्या छबिन्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. रात्री बारापर्यंत नित्रळ, सावली, कुरूळ, पाटेघर, कासाणी, आटाळी, रोहोट, वडगाव, कुडेघर, सह्याद्रीनगर, (सांगवी मुरा), आपटीमुरा गावांतून पालख्यांचे घाटाईदेवीच्या मंदिरात आगमन झाले.
देवीची आरती करून ढोल, लेझीम, ताशाच्या गजरात घाटाई देवीच्या जयघोषाने रात्री बारा वाजता छबिन्याच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. अग्रस्थानी नंदी, सासन काठ्या, सर्व पालख्यांच्या समवेत देवीच्या छबिन्याच्या कार्यक्रमात भाविकांनी दर्शन घेतले. आवार्डे, ता. पाटण मानाच्या नंदीचे आगमन होऊन कासाणी, सह्याद्रीनगरमधील लेझीम पथके सहभागी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व पालख्यांना विडा दिला. संध्याकाळपर्यंत दुकाने गजबजलेलीच होती.
यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा, श्री घाटाईदेवी देवस्थान ट्रस्ट, विश्वस्त मंडळाच्या वतीने मोठ्या स्वरूपात तयारी होती. लहान मुलांची खेळणी, मिठाईची दुकानासह विविध दुकाने भाविकांच्या गर्दीने गजबजलेली होती. जादा एसटी बसेसची सोय केली होती. आरोग्य यंत्रणेसह पोलिस यंत्रणाही कार्यरत होती.