कऱ्हाडला खांबांवरील पन्नास बल्बची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:54 AM2021-02-26T04:54:13+5:302021-02-26T04:54:13+5:30

कऱ्हाड : शहरातील वाखाण भागातील शिक्षक कॉलनी ते पवार वस्तीपर्यंत जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर पालिकेने लावलेले पन्नास एलईडी बल्ब चोरीस ...

Theft of fifty bulbs from the poles of Karhad | कऱ्हाडला खांबांवरील पन्नास बल्बची चोरी

कऱ्हाडला खांबांवरील पन्नास बल्बची चोरी

Next

कऱ्हाड : शहरातील वाखाण भागातील शिक्षक कॉलनी ते पवार वस्तीपर्यंत जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर पालिकेने लावलेले पन्नास एलईडी बल्ब चोरीस गेले आहेत. याबाबतची माहिती पालिकेत समजल्यानंतर खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री या बल्बची चोरी झाली असावी, असा अंदाज आहे. मात्र पालिकेने पोलिसात कोणतीही तक्रार दाखल केली नाही. पालिकेचे सव्वा लाखाचे बल्ब चोरीस गेल्याने त्या भागातील नागरिकही संतापले आहेत. बल्ब नसल्याने या भागात अंधार पसरला आहे. शिक्षक कॉलनी ते वाखाण परिसरात पवार वस्तीपर्यंत पालिकेने पोल टाकून तेथे दिवाबत्तीची सोय केली आहे. काहीच दिवसांपूर्वी पालिकेने चांगल्या दर्जाचे एलईडी बल्ब बसवले होते. त्यापैकी पन्नास बल्ब चोरीला गेले आहेत.

कृष्णा कॉलेजमध्ये गाडगे महाराजांना अभिवादन

कऱ्हाड : शिवनगर-रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील कृष्णा महाविद्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. उपप्राचार्य प्रा. बनसोडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष इतिहास विभागप्रमुख व्ही. के. सोनवले यांनी गाडगे महाराज यांच्या कार्याची ओळख करून दिली. प्रास्ताविक महावीर कांबळे यांनी केले. प्रा. एम.व्ही. कुरणे यांनी आभार मानले.

येळगावच्या येडोबा देवाची यात्रा रद्द

कऱ्हाड : येळगाव, ता. कऱ्हाड येथील ग्रामदैवत व पंचक्रोशीसह अनेकांचे आराध्य दैवत असलेल्या येडोबा देवाची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे रविवारी २८ व सोमवार १ मार्च रोजी होणार होती. मात्र या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली आहे. तरी या दिवशी गावात यात्रेनिमित्त कोणत्याही प्रकारचे करमणूक कार्यक्रम तसेच कसल्याही प्रकारची दुकाने मांडता येणार नाहीत, याची सर्व भाविकांसह ग्रामस्थांनी नोंद घ्यावी. याबाबतीत ग्रामपंचायत व यात्रा समितीच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सरपंच मन्सुर बाबासाहेब इनामदार, माजी सरपंच सुचिता शेटे, उपसरपंच दिलीप पाटील यांच्यासह ग्रामस्थांची याबाबत बैठक पार पडली आहे.

खळेसह परिसरात वानरांचा धुमाकूळ

तळमावले : परिसरात वानरांनी धुमाकूळ घातला असून पिकांसह काही घरांचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वन विभागाने वानरांना पकडून सुरक्षितस्थळी सोडावे, अशी मागणी होत आहे. खळे गावामध्ये वानरांचा धुमाकूळ सुरू असल्याने घरांवरील पत्र्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच वानरांकडून दररोज पिकांची नासधूस सुरू आहे. शेतामधील भाजीपाला, कडधान्य, ज्वारी तसेच इतर पिके वानरांच्या तावडीतून सुटली तरच ती शेतकऱ्यांच्या हाताला लागत आहेत. अनेक वेळा शेतामधील ज्वारीची कणसे गायब होत आहेत आणि फक्त ज्वारीची ताटे राहत असून ती कणसे वानर फस्त करीत आहेत.

मोरणा विभागात बिबट्याची दहशत

पाटण : तालुक्यातील मोरणा विभागातील नोटोशी, कुसरूंड, वाडीकोतावडे आणि आंब्रग येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असून, त्याच्या डरकाळीने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतशिवारात जाणे बंद केल्यामुळे शेती, दुग्धव्यवसाय आणि पशुपालन व्यवसाय अडचणीत सापडले आहेत़ शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गायी-म्हशी, शेळीपालन करून दुग्ध व्यवसायासारखे शेतीपूरक उद्योग शेतकऱ्यांनी सुरू केले आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या विभागात बिबट्याच्या वावरामुळे शेती आणि पूरक व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.

पिंपरी ते रिसवड रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

मसूर : पिंपरी ते रिसवड रस्त्याची दुरवस्था झाली असून सदरचा रस्ता गेली अनेक वर्षे दुरुस्त केला नसल्याने दुरवस्थेत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधित रस्ता हा श्यामगाव घाटातून खाली येऊन कऱ्हाडला राष्ट्रीय महामार्गाला जाण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणून बनवण्यात आला होता. मात्र, हा रस्ता उखडल्याने या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी रिसवड येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश इंगवले यांनी केली आहे.

Web Title: Theft of fifty bulbs from the poles of Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.