नागठाणे : नागठाणे, ता. सातारा येथे कृषी विभागाच्या वतीने दोनशे शेतकऱ्यांच्या शंभर एकर क्षेत्रावर आले पिकाची लागण करण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मक आले पीक प्रकल्पांतर्गत थेट निर्यातदारांना विक्री करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.आल्याचे हे उत्पादन निर्यातक्षम घेऊन त्याची थेट निर्यातदार कंपनीला विक्री करणे, या ध्येयाने आत्मा प्रकल्प संचालक गणेश घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी विठ्ठलराव भुजबळ, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनातून दोनशे शेतकऱ्यांच्या शंभर एकर क्षेत्रावर आल्याची लागवड केली आहे. यासाठी २० शेतकरी स्वयंसहायता गटाची स्थापना करणे व कंपनीच्या माध्यमातून निर्यातदारांशी थेट संपर्क करून आले व भाजीपाल्याची निर्यात करणे यासाठी हा प्रकल्प राबविला जात आहे.हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यासाठी मनोहर साळुंखे, कृषी पर्यवेक्षक अर्जुन पवार, अजिंक्य पवार परिश्रम घेत आहेत. तसेच या प्रकल्पात बळीराजा, चौंडेश्वरी, अजिंक्य, सह्याद्री, वरद, शिवशक्ती, भूमिपुत्र, निसर्ग, हरितक्रांती, अंबामाता, वाघुडबाबा, मोरमळवी, शिवशंकर या स्वयंसहायता गटातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. (वार्ताहर)अन्नद्रव्याचे वितरणया प्रकल्पात जागतिक बँकेच्या अर्थसाह्यातून सहभागी शेतकरी गटांना १०:२६:२६, डीएपी व चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्याचे अनुदानावर वितरण करण्यात आले आहे. तसेच शेतकरी व निर्यातदार प्रतिनिधींची मुंबई येथे बैठक होऊन आले उत्पादन व विक्री व्यवस्थेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती कृषी सहायक अंकुश सोनावले यांनी दिली.
नागठाण्याच्या आल्यासाठी परदेशातील कंपनी आली!
By admin | Published: September 10, 2014 10:19 PM