कोळकी : विडणी येथे चोरट्यांनी रात्री धुमाकूळ घालून रात्रीत दोन विद्युत ट्रान्सफाॅर्मर आणि वीस ते पंचवीस मोटारींची चोरी करून जवळ पास दोन ते अडीच लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी की, रविवारी रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बेडके वस्तीवरील तावरे यांच्या शेतात असलेला ६३ केबीए क्षमतेचा विद्युत ट्रान्सफाॅर्मर, इंगळे वस्तीवरील ज्ञानेश्वर दिघे यांच्या शेतात असलेला १६ केबीए क्षमतेचा विद्युत ट्रान्सफार्मर हे सुुरू असतानाही चोरट्यांनी बंद करून त्यातील ताब्याची तार काढली. तसेच सयाजी शिंदे यांच्या शेतात असलेला विद्युत ट्रन्सफाॅर्मर बंद केला होता. परंतु तार अल्युमिनिअमची असल्याने तो तसाच सोडून चोरटे निघून गेले. त्यांचा मोर्चा निरा उजवा कालव्याकडे वळवून कालव्यालगत शेतकऱ्यांनी शेतात पाणी नेण्यासाठी बसवलेल्या विडणी ते पिंपरद गावांपर्यंतच्या जवळपास वीस ते पंचवीस मोटारींवर चोरट्यांनी डल्ला मारून जवळपास दोन ते अडीच लाखांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात महावितरणचे विडणी शाखेतील वरिष्ठ वायरमन दस्तगीर शेख यांनी फिर्याद दिली आहे. फलटण ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.
चौकट
चोरीला गेलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरवर जवळपास तेरा मोटारींची विद्युत जोडणी होती. तसेच निरा उजवा कालव्यालगत शेतीला पाणी नेण्यासाठी विडणी ते पिंपरद गावादरम्यान जवळपास वीस ते पंचवीस मोटारी चोरून नेल्या. शेतकऱ्यांची शेतातील पिके करपू लागली आहेत. कोरोनाचे संकट, त्यात विद्युत मोटारी व विद्युत ट्रान्सफाॅर्मर चोरीला गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
050721\1441-img-20210705-wa0012.jpg
विडणी येथिल डि.पी.फोडून कॉपर तार चोरुन नेली छाया सतिश कर्वे