तेरा हजार कोरोना वॉरियर्सला मिळणार सुरक्षाकवच : प्रोत्साहन भत्ता, विमा संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 10:57 PM2020-04-02T22:57:26+5:302020-04-02T23:02:31+5:30
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी गावपातळीवर आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या यांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता व ९० दिवसांसाठी पंचवीस लाख रुपयांचा विमा उतरण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला.
स्वप्नील शिंदे ।
सातारा :ग्रामीण भागातील लोकांसाठी रात्रं - दिवस ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्त्या झटत आहेत. या योद्ध्यांना शासनाने प्रोत्साहनपर भत्ता व विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील १३ हजार ३३१ जणांना सुरक्षाकवच मिळाले आहे.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी गावपातळीवर आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या यांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता व ९० दिवसांसाठी पंचवीस लाख रुपयांचा विमा उतरण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला.
सध्या गावपातळीवर हे कर्मचारी ग्रामस्थांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती, स्वच्छता, आरोग्यविषयक सर्वेक्षण, औषध फवारणी अशी कामे अहोरात्र करत आहेत. ही कामे या सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाचा भाग असला तरी जोखीम पत्करून हे कर्मचारी काम करत आहेत म्हणून त्यांना एक हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम अदा करण्यात येणार आहे. यासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याज व या वित्त आयोगातील गेल्या पाच वर्षांतील अखर्चित निधी आरोग्य आणि उपजीविका यासाठी वित्त आयोगाच्या निधीतील २५ टक्के तरतूद, तसेच जिल्हा परिषद सेस फंड याचा वापर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील २३५२ ग्रामपंचायत कर्मचारी, ४६१२ अंगणवाडी सेविका, ३६५४ अंगणवाडी मदतनीस, २७१३ आशा कार्यकर्त्या अशा एकूण १३ हजार ३३१ कर्मचा-यांना लवकरच केलेल्या कामाबद्दल प्रोत्साहनपर भत्ता व विमा देण्यात२ येणार आहे.
कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी शासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. या निर्णयाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्त्या हे आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांचा विमा काढण्याची लवकरच प्रक्रिया सुरू होईल.
-अविनाश फडतरे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद सातारा