पावसापूर्वी साडेतीन हजार पूल अन् मोऱ्यांची तपासणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:46 AM2019-06-05T11:46:38+5:302019-06-05T11:48:41+5:30
वसापूर्वी रस्ते अधिक सुरक्षित रहावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा अंतर्गत अखत्यारित असलेल्या मार्गावर जिल्ह्यातील साडे तीन हजारांहून अधिक पूल आणि मोऱ्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. संबंधितांच्या अहवालानंतर धोकादायक ठिकाणी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
सातारा : पावसापूर्वी रस्ते अधिक सुरक्षित रहावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा अंतर्गत अखत्यारित असलेल्या मार्गावर जिल्ह्यातील साडे तीन हजारांहून अधिक पूल आणि मोऱ्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. संबंधितांच्या अहवालानंतर धोकादायक ठिकाणी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा अंतर्गत इतर जिल्हा आणि ग्रामीण मार्ग येतात. गावागावांशी जोडणारे हे मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित असणे महत्वाचे असते. त्यासाठी जिल्हा परिषदेचा उत्तर आणि दक्षिण बांधकाम विभाग पावसापूर्वी संबंधित मार्गावरील पूल आणि मोऱ्यांची तपासणी करतो. त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी कामे करण्यात येतात. धोकादायक पूल, मोऱ्यांतील घाण काढून स्वच्छ करणे, उगवलेली झाडे काढणे, पाणी मोऱ्यांतून प्रवाही राहील असे पाहण्यात येते. सध्या बांधकाम विभागाच्या वतीने जिल्ह्यात तपासणी मोहीम सुरू असून लवकरच त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे.
बांधकामच्या उत्तर विभागाच्या अंतर्गत सातारा, कोरेगाव, फलटण, खंडाळा, वाई आणि महाबळेश्वर हे तालुके येतात. या विभागांतर्गत इतर जिल्हा मार्गावर ३ मोठे पूल आहेत. सातारा तालुक्यातील पोगरवाडी येथे उरमोडी नदीवर, हिवरे, ता. कोरेगाव येथे वांग नदीवर तसेच महाबळेश्वर तालुक्यात चतुरबेट येथे कोयना नदीवर पूल आहेत. त्याचबरोबर इतर जिल्हा मार्गावर ८०२ तर ग्रामीण मार्गावर १०९७ मोऱ्या आहेत.
दक्षिण विभागा अंतर्गत माण, खटाव, कऱ्हाड , पाटण आणि जावळी हे तालुके येतात. या विभागाकडे इतर जिल्हा मार्गावरील ५६ रस्ते आहेत. त्यावर ६०१ लहान मोठे पूल आहेत. तर ग्रामीण मार्गावर १४९० रस्त्यावर १०६६ लहान मोठे पूल आहेत.
या दोन्ही विभागांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील बांधकाम विभागाचे अधिकारी पूल आणि मोऱ्यांसंदर्भात तपासणी करणार आहेत. सध्या अनेक ठिकाणी काम सुरू झाले असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाऊस सुरू होण्यापूर्वी बांधकाम विभाग संभाव्या धोक्याच्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करणार आहे.