मोती तळ्यातून तीन गाड्या निर्माल्य बाहेर, सातारा पालिकेची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:55 PM2019-06-05T12:55:08+5:302019-06-05T12:57:51+5:30
शुक्रवार पेठेत असलेल्या ऐतिहासिक मोती तळ्याची पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता करण्यात आली. या तळ्यातून तब्बल तीन टिपर निर्माल्य व इतर कचरा बाहेर काढण्यात आला. सध्या तळ्यात मुबलक पाणीसाठा असून, नागरिकांनी याचा दैनंदिन कामकाजासाठी वापर करावा, असे आवाहन आरोग्य सभापती यशोधन नारकर यांनी केले आहे.
सातारा : शुक्रवार पेठेत असलेल्या ऐतिहासिक मोती तळ्याची पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता करण्यात आली. या तळ्यातून तब्बल तीन टिपर निर्माल्य व इतर कचरा बाहेर काढण्यात आला. सध्या तळ्यात मुबलक पाणीसाठा असून, नागरिकांनी याचा दैनंदिन कामकाजासाठी वापर करावा, असे आवाहन आरोग्य सभापती यशोधन नारकर यांनी केले आहे.
सातारा शहर वसविणाऱ्या द्रष्ट्या राज्यकर्त्यांनी आपल्या दूरदृष्टीतून शहरात पाणी खेळवले. यासाठी ठिकठिकाणी हौद, तळ्यांची उभारणी करण्यात आली. कालौघात अनेक हौद व तळी नामशेष झाली. तर काही आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्यापैकी एक असलेल्या मोती तळ्याला देखील ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. गेल्या काही वर्षांपासून या तळ्याचा वापर निर्माल्य टाकण्यासाठीच केला जात आहे.
परिणामी तळ्यातील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. पाणी असूनही त्याचा चांगल्या कामासाठी वापर केला जात नव्हता. टंचाई काळात निर्माण झालेली पाण्याची गरज ओळखून पालिकेच्या आरोग्य विभागाने तळे स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. आठ कर्मचाऱ्यांच्या मतदीने तळ्यातून तब्बल तीन टिपर निर्माल्य तसेच प्लास्टिक व इतर कचरा बाहेर काढण्यात आला. चार दिवसांनंतर घाणीच्या विळख्यात सापडलेल्या मोती तळ्याने मोकळा श्वास घेतला.
पाणी उपसा करण्यासाठी मोटार : श्रीकांत आंबेकर
मोती तळ्यात मुबलक पाणी असून, याचा बांधकाम व इतर कामांसाठी वापर करावा. नागरिकांना पाणी मिळावे, यासाठी तळ्यावर मोटार बसविली जाणार आहे. या माध्यमातून पाणी उपसा केला जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
नागरिकांनी तळ्यात निर्माल्य व इतर कोणत्याही वस्तू न टाकता या ऐतिहासिक तळ्याचे पावित्र्य जपावे. जर कोणी कचरा अथवा इतर कोणत्याही वस्तू तळ्यात टाकताना आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- माधवी कदम, नगराध्यक्षा
मोती तळ्याची स्वच्छता करण्यात आली आहे. या तळ्यात सध्या मुबलक पाणीसाठा आहे. बांधकाम व इतर कामकाजासाठी या पाण्याचा वापर होऊ शकतो. पाणीउपसा झाला तर पावसात तळे स्वच्छ पाण्याचे भरेल.
- यशोधन नारकर,
आरोग्य सभापती