ढेबेवाडी : सणबूर, ता. पाटण येथील दोन सख्ख्या व एक चुलत बहिणींसह आजोबा वांग नदीच्या पात्रातून वाहून गेले. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, वाहून जाणाऱ्या दोन मुलींना व आजोबांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले तर एका मुलीचा दुपारपर्यंत शोध घेण्याचे काम सुरू होते.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सणबूर, ता. पाटण येथील शंकर रामचंद्र ताटे (वय ६२), क्षितिजा शिवाजी साठे (वय १२), स्वरांजली आनंदा साठे (वय १०), श्रावणी शिवाजी साठे (वय १०) हे कुठरे येथे बुधवारी मामाच्या गावाला गेले होते. गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तिन्ही मुली आपल्या आजोबांसमवेत कुठरेकडून सणबूरकडे वांग नदीपात्रातून चालत निघाल्या होत्या.
दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सर्वजण नदीतील पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेले. सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर वाहून जात असल्याचे नदीकाठी कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी व अंघोळ करण्यासाठी पुरुषांनी त्यांना पाहिले.
त्यावेळी काही पुरुषांनी प्रसंगावधान राखत नदीपात्रात उडी घेतली व आजोबांसहित दोन मुली स्वराजंली व श्रावणी यांना वाचवून नदीपात्राबाहेर काढले. मात्र, तिसरी मुलगी क्षितिजा शिवाजी साठे ही त्यांच्या हाताला लागली नाही. ती पुढे तशीच पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेली. तिचा शोध दुपारपर्यंत घेण्याचे काम ग्रामस्थांकडून सुरू होते.