कमळावर घड्याळाची टिकटिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 11:47 PM2017-08-09T23:47:06+5:302017-08-09T23:47:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक ३0 जागांवर भलतीच वाजली, तर राष्ट्रवादीशी घरोबा करून भाजपने तब्बल चार जागांवर कमळ फुलविले. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शंभूराजे यांचा वारू या दोन्ही पक्षांनी ताकदीने रोखल्याचे मतमोजणीनंतर समोर आले.
नगरपंचायत व नगरपालिका या दोन मतदारसंघातील सातही जागा राष्ट्रवादीने काबीज केल्या. राष्ट्रवादीने ४0 जागांपैकी ३0 जागा आपल्या पारड्यात खेचून आणल्या. राष्ट्रवादीच्या सहकार्यामुळे भाजपला चार जागा मिळाल्या. जिल्हा परिषदेत अवघे सात इतके कमी संख्याबळ असणाºया काँगे्रसने तब्बल पाच जागांवर आश्चर्यकारकरित्या विजय मिळविला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मंगेश धुमाळ, शिवाजीराव चव्हाण, रमेश पाटील, मानसिंगराव जगदाळे, उदय कबुले, बाबासोा पवार, बापू जाधव, उषादेवी गावडे, भारती पोळ, जयश्री फाळके, संगीता मस्कर, अर्चना रांजणे, दीपाली साळुंखे, संगीता खबाले-पाटील, विनीता पलंगे यांनी विजय मिळविला. इतर मागास प्रवर्गात राष्ट्रवादीने आठ जागा यापूर्वी बिनविरोध मिळविल्या होत्या. तर काँगे्रसच्या अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर, निवास थोरात, सुनिता कदम यांनी विजय मिळविला. काँगे्रसला या मतदारसंघात यापूर्वी दोन जागा बिनविरोध मिळाल्या होत्या. भाजपच्या मनोज घोरपडे, सुवर्णा देसाई, रेश्मा शिंदे यांनी विजय मिळविला. तसेच भाजपला यापूर्वीच एक जागा बिनविरोध मिळाली होती. सातारा विकास आघाडीच्या अर्चना देशमुख या एकमेव उमेदवार विजयी झाल्या.
दरम्यान, नगरपंचायत मतदारसंघातील दोन जागांवर शोभा माळी, संजय पिसाळ यांनी विजय मिळविला. नगरपालिका मतदारसंघात राष्ट्रवादीचे विनोद उर्फ बाळू खंदारे, लीना गोरे, आनंदा कोरे, पल्लवी पवार, चरण गायकवाड हे पाच उमेदवार विजयी झाले.
पराभूत दीपाली साळुंखे विजयी
जिल्हा परिषद मतदारसंघात महिलांसाठी राखीव जागेची मतमोजणी झाली. त्यात राष्ट्रवादीच्या दीपाली साळुंखे व सातारा विकास आघाडीच्या अनिता चोरगे यांना दोन फेºयांत सारखी मते पडल्याचे स्पष्ट करीत चिठ्ठीचा प्रयोग करून साळुंखे यांना पराभूत घोषित केले.
राष्ट्रवादीच्या सुरेंद्र गुदगे, राजकुमार पाटील, श्रीनिवास शिंदे यांनी याबाबत हरकत नोंदवित पुन्हा मोजणीचा आग्रह धरला, त्यात दीपाली साळुंखे विजयी ठरल्या.