सातारा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, शुक्रवारी फलटणला रामराजे नाईक-निंबाळकर, कऱ्हाडला आनंदराव पाटील, उंब्रज येथे धैर्यशील कदम आणि माण तालुक्यात जयकुमार गोरे यांच्या विरोधातील आमचं ठरलंय गटाचा मेळावा होत आहे. यामधून हे सर्व गट पुढील राजकीय दिशा ठरविणार आहेत.सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. आता या किल्ल्यालाच भगदाड पडले आहे. तर आणखी काहीजण शिवसेना, भाजपच्या वाटेवर आहेत. यामध्ये काँग्रसचेही नेते आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी फलटणला मेळावा घेतलाय. शिवसेनेमध्ये त्यांचे जायचे निश्चित झाल्याचे सांगण्यात येतंय.
या मेळाव्यात ते अधिकृत भूमिका जाहीर करतील. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू आणि काँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील हेही भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या गटाचा कऱ्हाडला मेळावा होत आहे. कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम गटाचाही उंब्रजला मेळावा होत आहे. तेही पुढील राजकीय भूमिका ठरविणार आहेत.भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपमधील अनेकजण माण तालुक्यात एकत्र आलेत. त्यांच्या आमचं ठरलंय गटातर्फे दहिवडीत मेळावा होतोय. यामध्ये एका उमेदवाराचं नाव निश्चित होणार आहे. त्यामुळे शुक्रवारचा दिवस सातारा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा ठरणार आहे.