सातारा : कधी नव्हे ते टोमॅटो दराला लाली चढली आहे. शेतीच्या बांधावर येऊनही व्यापारी १०० रुपये किलोने टोमॅटो घेऊन जात आहेत. त्यामुळे जादा मागणी आणि उत्पादन कमी असल्याने तीन वर्षांनंतर प्रथमच चांगला भाव आला आहे. पण, हा दर कायम राहील का याविषयीही साशंकता आहे. कारण, ‘टोमॅटो पिकवायचा आम्ही, दर ठरवतो व्यापारी,’ अशी भावनाच शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.दरवर्षी पावसाळ्याच्या काळात भाजीपाल्याचे दर वाढतात. पण, मागील दोन वर्षाततरी टोमॅटो ६० रुपयांच्या पुढे गेला नव्हता. आता मात्र, टोमॅटोने उच्चांकी दर गाठला आहे. चांगला टोमॅटो घ्यायचा झाला तर किलोला १०० ते १२० रुपये मोजण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. नवीन उत्पादन बाजारात येत नाही तोपर्यंत दर वाढलेलाच राहणार आहे. पण, यामध्ये शेतकऱ्यांना किती फायदा हाही विषय आहे.
कारण, तीन वर्षे टोमॅटो घेतला. पण, कधीही २० ते ३० रुपयांवर दर मिळालेला नाही, असे शेतकरी सांगत आहेत. कधी पाऊस तर कधी ऊन यामुळे मालाचे नुकसान झाले. तर अनेकवेळा उत्पादन जादा असल्याने दर कमी मिळाला अशी स्थिती होती. आता दर मिळत असला तरी व्यापाऱ्यांच्या हातात बऱ्याच गोष्टी असल्याचे शेतकरी सांगतात. माल चांगला नाही म्हणून दर पाडून मागतात. यात शेतकऱ्यांचाच तोटाच आहे.एक एकर टोमॅटोला दोन लाखांचा खर्च...एक एकर टोमॅटो पीक घ्यायचे झाले तर त्याला दोन लाख रुपये तरी खर्च येतो. यामध्ये लागण, खत, मुजरी, आैषधे, कागद आदींचा समावेश आहे.