प्रगती जाधव-पाटील - सातारा --विद्यार्थ्यांना शिकवायचे, दफ्तरनोंदी करायच्या, शासकीय योजना सामान्यांपर्यंत पोहोचवायच्या का, महिन्यातून चार-चारवेळा आयोजित केलेल्या प्रशिक्षणात सहभागी व्हायचे, असा प्रश्न प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना गेल्या काही दिवसांपासून सतावत आहे. प्रशिक्षणाच्या वाढत्या ओझ्याने शिक्षक अक्षरश: बेजार झाले आहेत.राज्य शासनाने कोणतीही नवीन योजना काढली की, त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी शिक्षकांवर येते. त्यासाठी कधी जिल्हा परिषद तर कधी पंचायत समितीमध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. शाळेतील अभ्यासक्रम आणि वैयक्तिक आयुष्यातील व्यवधाने सांभाळून शिक्षकांना सक्तीने या सर्व प्रशिक्षणांना सामोरे जावे लागत आहे. शिक्षकांनी पिढ्या घडविण्याची अपेक्षा करत असताना त्यांना अध्ययनासाठी वेळच नसतो, ही वस्तुस्थिती आहे. यातून मार्ग काढून अध्ययनाविषयी मार्गदर्शन झाले तर त्याचे कौतुक शिक्षकांनाही वाटेल.अशी करावी लागते शिक्षकांना कसरतविद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे कितीही महत्त्वाचे प्रशिक्षण असले तरीही शिक्षकांना अध्यापन पूर्ण करावे लागते. काही ठिकाणी शिक्षक वर्गातील हुशार मुलांवर वर्ग सोपवून प्रशिक्षणासाठी निघून जातात.प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले तर बऱ्याचदा दोन शिक्षकी शाळेतील शिक्षक आळीपाळीने प्रशिक्षणासाठी जातात. त्यावेळी मात्र, अख्ख्या शाळेची जबाबदारी एकाच शिक्षकावर पडते.शिक्षक वर्गात नसताना शाळेत काही अघटित घडले किंवा अपघात झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशिक्षणासाठी बाहेर गेलेल्या शिक्षकावर असते. त्यामुळे हजर नसतानाही अनेकदा या शिक्षकांना भुर्दंड सोसावा लागत आहे.प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर त्याची टिपणे काढून प्रत्यक्ष कृती काय केली, याविषयीचा अहवाल बनवावा लागतो. म्हणून प्रशिक्षण नको पण अहवाल आवरा, अशी म्हणण्याची वेळ शिक्षकांवर येते.
प्रशिक्षणाच्या ओझ्याने शिक्षक बेजार
By admin | Published: October 14, 2015 10:22 PM