कराड : सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केले आहे. या आदेशाने कराडच्या व्यापारी वर्गात मोठी नाराजी पसरली असून मिनी लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. गेले वर्षभर कोरोनाच्या दुष्टचक्रात व्यापारी वर्ग भरडला असताना पुन्हा लॉक डाऊनची आपत्ती आली आहे. यातून दुकाने काही वेळ सुरू ठेवण्यास सवलत मिळावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन केली. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिवांशी बोलण्याचे आश्वासन चव्हाण यांनी व्यापाऱ्यांना दिले.
मंगळवारपासून ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्रित येत पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. चव्हाण यांनी व्यापारी वर्गाच्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासनही दिले.
गेले वर्षभर कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आर्थिक परिस्थिती सुधारत असताना आता पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांसह दुकानातील कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. शुक्रवार ते रविवार दुकाने बंद ठेवण्यास व्यापा-यांचा पूर्ण पाठिंबा होता. असे असताना संपूर्ण आठवडाभर दुकाने बंद ठेवण्याचा आदेश अचानक जारी करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या व्यापाऱ्यांना रोज दुकाने काही वेळ सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.
दरम्यान, व्यापाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे मुख्य सचिवांशी बोलून अत्यावश्यक सेवेतील दुकानाबाबत काही सुधारणा करून व्यापाऱ्यांना सवलत देता येते का, याबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो : कराड येथे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या बरोबर चर्चा करताना व्यापारी