वाई : वाई तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मांढरदेव घाटातील मुख्य रस्त्यावर गुरुवारी सकाळी आठ वाजता दरड कोसळली. यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. बांधकाम विभागाच्या श्रीपाद जाधव व त्यांच्या पथकाने तीन तासांच्या अथक प्रयत्नातून रस्ता मोकळा करीत वाहतूक सुरळीत केली.वाई तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पाऊस व दाट धुक्यांमुळे घाटातून जाताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. मांढरदेव घाटात गुरुवारी सकाळी भलीमोठी दरड कोसळली असली तरीही कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. मुसळधार पावसातसुध्दा जेसीबी मशिन व कर्मचाऱ्यांमुळे ढासळलेली दरड हटविण्यात यश आले.त्यामुळे वाहतुकीचा निर्माण झालेला प्रश्न मार्गी लावण्यात यश आले. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर जास्त वाहतूक नव्हती. त्यामुळे कसलेही नुकसान झाले नाही. तरीही देवीच्या वारादिवशी या घाटात प्रचंड गर्दी असते. घाटात मोठी रांग लागलेली होती. भोरकडे जाणारे प्रवासी शक्यतो याच घाटाचा उपयोग करीत असल्याने वाहनांची गर्दी कमी नसते.
दरडी कोसळण्याची भीती व पडणारा प्रचंड पाऊस यामुळे दरड हटविण्यात अडचणी येत होत्या. तरीही मोठ्या प्रयत्नांनी कोसळलेली दरड हटवून वाहतूक सुरळीत केली. सध्या पडत असलेल्या प्रचंड पावसामुळे मांढरदेव घाटात दरडी कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने वाहन चालकांनी रात्रीच्या वेळी शक्यतो या घाटातून प्रवास टाळावा, असे आवाहन बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत झाली होती.पर्यटन वाढीसाठी रस्ते दुरुस्ती महत्वाचीगेल्या अनेक वर्षांमध्ये दरवर्षी बांधकाम विभागाला शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने घाटांकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाचगणी महाबळेश्वरला तसेच मांढरदेवमार्गे भोरला जाणाºया पर्यटकांमध्ये या घाटात कोसळत असणाºया दरडी या टीकेचे कारण बनत आहेत. वाई विधानसभा मतदार संघात पर्यटन वाढीसाठी जर प्रत्यत्न करावयाचे असल्यास रस्त्यांना प्राधान्य देण्याची नितांत गरज आहे,ह्ण असे मत पर्यटक व्यक्त करत आहेत.