सातारा : ट्रेकिंगसाठी उतरलेले पुण्यातील चार ट्रेकर्स ठोसेघर धबधब्यात अडकल्याने मोठी खळबळ उडाली. या ट्रेकर्सना तब्बल साडेचार तासांच्या अथक प्रयत्नानंतर पहाटे तीन वाजता धबधब्यातून वर काढण्यास यश आले. हा सारा थरार बुधवारी मध्यरात्री घडला.
अभियांत्रिकेचे शिक्षण घेणारे पुण्यातील निसर्ग शेट्टे, श्रेयस सातपुते, निहार श्रोत्री, अक्षय देशमुख हे चारजण मंगळवारी सकाळी ठोसेघरला फिरण्यासाठी आले होते. धबधबा परिसरात फिरून झाल्यानंतर त्यांना धबधबा ज्या ठिकाणी कोसळतो, तेथे जायचे होते. त्यामुळे त्यांनी दुपारी चारच्या सुमारास पायवाटेने दरीत उतरण्यास सुरुवात केली. खूप अंतर ते दरीत उतरले होते. परंतु तेथे पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की,आपण चालत लवकर खाली आलोय. मात्र, पुन्हा वर जाणे अवघड आहे. त्यामुळे त्यांनी दुपारी पुन्हा वरती जाण्याचा निर्णय घेतला. डोंगरावरील ओले गवत आणि पावसाचा जोर वाढत गेल्याने चौघांनाही वरती येता येत नव्हते. तोपर्यंत अंधार पडला. डोंगरातील पायवाटही दिसेनासी झाली. त्यातील दोन युवक कसे बसे दरीतून वर आले आणि त्यांनी फोन करून साता-यातील ट्रेकर्सशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. राहुल तपासे आणि शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्सच्या टीमने रात्री साडेदहा वाजता या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री एकच्या सुमारास निहार श्रोत्री, अक्षय देशमुख ही मुले दरीत आढळून आली. प्रथम त्यांना पाणी ग्लुकोन डी आणि खाण्याची पाकिटे देण्यात आली. पोटात आधार मिळाल्यानंतर या दोन्ही मुलांना ट्रेकर्सनी पहाटे तीन वाजता ठोसेघरच्या धबधब्यातून वर काढले. त्यावेळी या मुलांचा जीव भांड्यात पडला.
या मोहिमेत राहुल तपासे, शर्मा, चंद्रसेन पवार, अविनाश पवार, दिग्विजय पवार आणि इतर सहकारी ट्रेकर्स सहभागी झाले होते. त्यांच्या या यशस्वी मोहिमेबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी त्यांचे कौतुक केले.