विद्यार्थ्यांच्या बाजारपेठेत ५० हजारांची उलाढाल : शेरेचीवाडीतील शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:52 PM2018-10-22T22:52:39+5:302018-10-22T23:00:13+5:30
फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी (हिंग) शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कच्या मालापासून दिवाळीसाठी लागणाºया वस्तू बनवून शाळेच्या बाजारात विक्रीस ठेवून ठेवण्यात आल्या होत्या.
आदर्की : फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी (हिंग) शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कच्या मालापासून दिवाळीसाठी लागणाºया वस्तू बनवून शाळेच्या बाजारात विक्रीस ठेवून ठेवण्यात आल्या होत्या. या मुलांनी भरविलेल्या बाजारपेठेत सुमारे ५० हजारांची विक्री झाली. एवढ्या लहान वयात मुलांना यानिमित्ताने व्यवहाराचे ज्ञान घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फलटण तालुक्यातील शेरेची वाडी (हिंग) शाळेतील शिक्षकांनी पुणे येथून पणत्या बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करून शाळेतील ८० विद्यार्थ्यांना दिला.या विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापक संजय शिंदे, सुनील बोडके, सचिन गुरव यांनी आठ दिवस प्रशिक्षण देऊन रंगीबेरंगी आकर्षक पणत्या मुलांकडून बनवून घेतल्या. शनिवारी शालेय विद्यार्थ्यांनी बाजार भरवून त्यामध्ये भाजीपाला, अन्नधान्याबरोबर पणत्याही विक्रीसाठी ठेवल्या होत्या. पणत्या व भाजीपाला यातून पन्नास हजार रुपयांची विक्री झाली. शालेय बाजाराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभापती प्रतिभा धुमाळ, सरपंच शामराव कणसे, पोलीस पाटील प्रथमेश सूर्यवंशी, शिवाजी घाडगे, दादासाहेब गोपनर, अप्पासाहेब नलवडे केंद्रप्रमुख रणवरे, अर्जुन भोईटे, इलाई आतार, उत्तम निंबाळकर, शिवाजीबोडके, रमेश जाधव आदी शिक्षक, ग्रामस्थ, माहिला, विद्यार्थी उपस्थित होते.
शेरेचीवाडीचा उपक्रम प्रेरणादायी
स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळा मागे राहू नयेत, यासाठी सातारा जिल्हा परिषद शाळेसाठी भौतिक सुविधा त्याबरोबर बॅच, डिजिटल क्लासरूम, शैक्षणिक, साहित्य, आनंद मेळावे आयोजित करत आहेत. शेरेचीवाडी शाळेचा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे दत्ता अनपट यांनी यावेळी सांगितले. असेच उपक्रम सुरु ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
विद्यार्थ्यांनी देवाण-घेवाणीचे ज्ञान यावे, आपण बनविलेल्या वस्तूची विक्री कशी करावी, यासाठी शालेय आठवडा बाजार भरवला. त्याला ग्रामस्थ, महिलांनी प्रतिसाद दिल्याने ५० हजारांची विक्री झाली.
- संजय शिंदे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा शेरेचीवाडी