दहिवडी : माण तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. यासोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाने दहिवडी, म्हसवड, बिदाल, मार्डी, मलवडी, कुकुडवाड, गोंदवले बुद्रुक, शिंगणापूरसह तब्बल सत्तावीस गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. कोरोनाबाधितांच्या विस्फोटामुळे प्रशासन सतर्क झाले असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबविणार असल्याचे निर्देश प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत काहीसा सुरक्षित राहिलेला माण तालुका कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या प्रादुर्भावाने हादरला आहे. अनेक गावे कोरोनाचा हॉट स्पॉट बनली आहेत. दहिवडी, म्हसवड या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. बाधितांच्या संख्येसोबतच मृतांची संख्याही वाढू लागली आहे. या परिस्थितीमुळे प्रशासनावर कमालीचा ताण आला असून, सर्वांनाच चिंतेने ग्रासले आहे.
त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी माणचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी तालुक्यातील दहिवडी, म्हसवड, बिदाल, शिंगणापूर, मार्डी, मलवडी, कुकुडवाड, गोंदवले बुद्रुक, आंधळी, शिरवली, पांगरी, भालवडी, राणंद, वावरहिरे, सोकासन, मोही, खुटबाव, दिवड, वरकुटे म्हसवड, हिंगणी, लोधवडे, गोंदवले खुर्द, नरवणे, पळशी, वरकुटे मलवडी, बनगरवाडी व वळई ही सत्तावीस गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. याबाबतचे आदेश संबंधित कोरोना नियंत्रण समितीला देण्यात आले आहेत.
प्रतिबंधित क्षेत्रातील गावांमध्ये दवाखाने व मेडिकल दुकाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित गावातील सर्व बँका तसेच पतसंस्थेचे आर्थिक व्यवहारही बंद ठेवण्यात आले असून, तहसीलदार व पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊन नागरिकांना किराणा साहित्य, भाजीपाला, दूध यासारख्या जीवनावश्यक सुविधा घरपोच देण्याची कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना कोरोना समितीला देण्यात आल्या आहेत.
चौकट...
नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे...
प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर जाण्यास व गावात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, आवश्यक ठिकाणी तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक कोरोना समितीने कडक उपाययोजना राबविण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.