विनायक राऊतांना दोन दिवसांची मुदत; वक्तव्य मागे घ्या, अन्यथा...
By नितीन काळेल | Published: May 28, 2023 08:08 PM2023-05-28T20:08:48+5:302023-05-28T20:09:31+5:30
शंभूराज देसाईंचा इशारा : अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार; ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे खोटे
नितीन काळेल
सातारा : ‘ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी माझ्याबद्दल उध्दव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे केलेले वक्तव्य धांदांत खोटे आहे. त्यामुळे राऊत यांनी दोन दिवसांत आपले म्हणणे मागे घेतले नाहीतर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे,’ असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. तसेच सुरतला गेलो तेव्हाच मातोश्रीची दारे बंद केल्याचाही पुनुरुच्चार केला.
येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री देसाई बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘गेल्यावर्षी विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर आम्ही सुरतला गेलो तेव्हापासून उध्दव ठाकरे परिवारासाठी अर्धा सेकंदही माझे बोलणे झालेले नाही. तसेच कोणा त्रयस्थामार्फतही निरोप दिलेला नाही. विनायक राऊत यांनी केलेले वक्तव्य १००१ टक्के खोटे आहे. महाविकास आघाडीतील आमदार आमच्या संपर्कात असल्याचे आमच्याकडून वक्तव्य झाले होते. ते खोडून काढण्यासाठी राऊत बोलले असावेत. पण, त्यांनी माझ्याबाबतचे वक्तव्य मागे घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत देणार आहे. त्यानंतर कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी पाटण दाैऱ्यावर आल्यानंतर पालकमंत्री देसाई यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. याचा समाचारही देसाई यांनी खरपूस शब्दात घेतला. अजित पवारांचे भाषण हे नैराश्येतून केल्याचे दिसून आले. कारण, त्यांच्या स्वागतासाठी तालुक्यात एखादं-दुसरं बॅनर दिसलं. तर पाटणमध्ये एकच स्वागत कमान दिसून आली. सभागृहातही २ हजारांपेक्षा अधिक माणसे एेकण्यासाठी नव्हती. मागील सहा महिन्यांत तर सत्यजित पाटणकरांचे दोन मोठे पराभव केलेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि पाटणकर गटही गलितग्रस्त झालाय, असेच एकप्रकारे देसाईंनी सुनावले. तसेच निधीबद्दलही पवारांनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री देसाई यांनी अडीचवर्षे ते उपमुख्यमंत्री आणि अऱ्थमंत्री होते. मी अऱ्थराज्यमंत्री होतो. तरीही त्यांनी बारामतीला किती निधी नेला ते बघावे, असे अजित पवार यांना आव्हान दिले. तर कऱ्हाड-चिपळूण रस्त्याचेही काम सुरु आहे. त्यामुळे अजित पवारांचे भाषण हे दर्जा घसरलेले असेच होते. तरीही त्यांची आणि माझी मैत्री आहे. ते असेच बोलत राहिले तर मी यापेक्षा अधिक बोलणार, असा इशाराही देसाईंनी यावेळी दिला.
पत्रा चाळेची टांगती सुरी...
खासदार संजय राऊत यांची सकाळची भुणभुण एेकायची सवय अजित पवार यांना असावी अशी टीका करतानाच मंत्री देसाईंनी राऊतांच्या डोक्यावर पत्रा चाळीची टांगती सुरी आहे. ती कधी खाली येईल ते समजणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील टीकेच्या प्रश्नावर देसाई यांनी पवार हे मोठे नेते आहे. जमालगोटा शब्द ग्रामीण भागात वापरतात. हे त्यांना माहीत नसावे असा टोला लगावला.