घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आगाशिव डोंगर पायथ्याला जखिणवाडी गावापासून काही अंतरावर वाघुरदरा नावाचा शिवार आहे. या शिवारात नितीन तुकाराम पाटील यांचे शेत आहे. पाटील यांच्या शेतात जखिणवाडी येथील राजेंद्र भिकू येडगे हे मेंढरांचा कळप चारायला घेऊन जातात. नेहमीप्रमाणे गुरुवारी येडगे मेंढ्या चारत असताना अचानक पाळीव श्वान भुंकत असल्याचे निदर्शनास आले. येडगे त्या दिशेने गेले असता दोन बिबट्यांनी श्वानासह मेंढरांवर हल्ला चढवला होता. क्षणार्धात दोन मेंढ्यांच्या नरड्याचा चावा घेऊन त्यांना ठार केले. त्यानंतर एका बिबट्याने एक मेंढी तर दुसऱ्या बिबट्याने श्वान घेऊन डोंगरात धूम ठोकली.
यावेळी नरड्याचा चावा घेतल्याने एक मेंढी गंभीर जखमी झाली होती. दोन बिबट्यांना पाहून येडगे यांनी घाबरून गावात फोन केला. ग्रामस्थांनी घटनेची खबर वन विभागाला दिली. वनपाल ए. पी. सवाखंडे , वनरक्षक रमेश जाधवर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. जखमी मेंढीवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलावले. मात्र, उपचार सुरू असताना सायंकाळी ती मेंढीही ठार झाली. मेंढपाळासमोरच बिबट्याने हल्ला केल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- चौकट
एक वर्षात अनेकवेळा हल्ला
जखिणवाडी गावाच्या पश्चिमेकडील शिवारात अनेकवेळा बिबट्याने शेळ्या ठार केल्या. गत काही महिन्यात येडगे यांच्याच शेतातील वस्तीवर पाच शेळ्या ठार केल्या होत्या. येडगे यांच्याच शेळ्यांवर हल्ला करण्याची पुन्हा तिसरी घटना घडली.
- चौकट
तीस हजाराचे नुकसान
जखिणवाडी येथील येडगे यांच्या कळपातील दोन मेंढ्या बिबट्याने ठार केल्या. या पाळीव जनावरांची बाजारभावाप्रमाणे सुमारे ३० हजारावर किंमत होते. येडगे यांनी सांभाळ केलेल्या मेंढ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्यामुळे त्यांचे सुमारे ३० हजाराचे नुकसान झाले आहे.