पाथरपुंजसह अन्य दोन गावं लवकरच सांगली जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:19 AM2019-08-28T00:19:43+5:302019-08-28T00:19:50+5:30
सातारा : देशात सर्वाधिक पावसाची नोंद झालेले सातारा जिल्ह्यातील पाथरपुंजसह मळे आणि कोळणे ही गावं लवकरच सांगली जिल्ह्यात पुनर्वसित ...
सातारा : देशात सर्वाधिक पावसाची नोंद झालेले सातारा जिल्ह्यातील पाथरपुंजसह मळे आणि कोळणे ही गावं लवकरच सांगली जिल्ह्यात पुनर्वसित होणार असल्याची माहिती आहे. सातारा जिल्ह्यात गावठाण जागा उपलब्ध होत नसल्याने सांगली जिल्ह्यातील जागेची पाहणी केल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली आहे.
याबाबत माहिती अशी, कोयनानगरच्या नैऋत्येला असलेले पाथरपुंज हे गाव सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे. पाथरपुंजसह मळे आणि कोळणे या तिन्ही गावांमध्ये मिळून ३५० कुटुंबांचे वास्तव्य आहे. यंदा जून ते आॅगस्टदरम्यान ७ हजार ३५९ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे येथील बहुतांश घरं कोसळली तर काही घरं पडण्याच्या स्थितीत अद्यापही तग धरून आहेत. महापुराचा आढावा घेण्यासाठी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीणसिंह परदेशी यांची सांगली-कोल्हापूर पूरपुनर्वसन विशेष समिती समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पाथरपुंज, मळे आणि कोळणे ही तिन्ही गावं चांदोलीच्या गाभा क्षेत्रात वसलेली आहेत. पूरपरिस्थिीतीत या गावांना भेटी दिल्यानंतर परदेशी यांनी या गावांचे पुनर्वसन होण्यासाठी तातडीने हालचाली करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सातारा, सांगली आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जागेचा शोध सुरू झाला. सातारा आणि रत्नागिरीमध्ये वनक्षेत्र असल्याने तेथे या गावांचे पुनर्वसन होणे तांत्रिकदृष्ट्या वेळ खाणारे ठरू शकते.
सांगली जिल्ह्यातील चांदोली अभयारण्यातील गाभा क्षेत्रात पाथरपुंज, मळे आणि कोळणे ही तीन गावं आहेत. येथील स्थानिकांच्या मागणीनुसार त्यांचे पुनर्वसन व्हावे, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार पाथरपुंजसाठी सांगली जिल्ह्यातील काही गावांची पाहणीही झाली आहे. पुढच्या वर्षी ही गावं गाभा क्षेत्रातून पुनर्वसित गावात वसवली जातील, असे निर्धारित केले आहे.
- डॉ. प्रवीणसिंह परदेशी,
समन्यवयक, सांगली-कोल्हापूर पूरपुनर्वसन विशेष समिती