दुचाकी-ट्रक अपघातात दोघे गंभीर जखमी; सातारा महामार्गावर अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 10:06 AM2020-04-24T10:06:31+5:302020-04-24T10:06:44+5:30
दुचाकीवरील जखमी झालेले दोघेही धनगर समाजाचे असून ते आपल्या शेळ्या मेंढ्या घेवून मोहोडेकरवाडी येथे आले होते.
- अभिनव पवार
सातारा : वेळे ता.वाई येथील महामार्गावरील सोळशी फाटा या ठिकाणी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास दुचाकी व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होवून अपघात झाला. या अपघातात दोघेजण गंभीररीत्या जखमी झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकीवरून शिवाजी साहेबराव बिचुकले (वय 40) व माधुरी चंद्रकांत बीचुकले (वय 36) दोघेही राहणार वाठार स्टेशन, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा हे मोहोडेकरवाडी, तालुका वाई येथून वाठार स्टेशनला जात होते. वेळे येथे महामार्ग ओलांडताना गुजरातहून तामिळनाडूच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने या दुचाकीला महामार्गावरच जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी तीस ते चाळीस फूट लांब उडून पडली. ट्रक चालक सुरेश कंनन वय 36, राहणार नामकल तामिळनाडू याने अपघातानंतर ट्रक जागेवरच थांबविला.
दुचाकीवरील जखमी झालेले दोघेही धनगर समाजाचे असून ते आपल्या शेळ्या मेंढ्या घेवून मोहोडेकरवाडी येथे आले होते. ते आज सकाळी त्यांच्या मूळ गावी जात असताना हा अपघात घडला. या अपघातात माधुरी यांचे दोन्ही पायाला गंभीर जखमा झाल्या असून शिवाजी यांचेही पायाला गंभीर जखम झाली आहे. या दोन्ही जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.