"उदयनराजेंच्या अफाट बुद्धीचा आविष्कार पोटनिवडणुकीत पाहिला", शिवेंद्रसिंहराजेंचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 06:52 PM2021-12-20T18:52:35+5:302021-12-20T19:09:11+5:30
सातारा : उदयनराजेंच्या अफाट आणि अचाट बुद्धीची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. लोकसभा मतदारसंघात खासदार असताना चार महिन्यांत राजीनामा ...
सातारा : उदयनराजेंच्या अफाट आणि अचाट बुद्धीची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. लोकसभा मतदारसंघात खासदार असताना चार महिन्यांत राजीनामा देणाऱ्या उदयनराजेंच्या बुद्धीचा आविष्कार आणि पराक्रम जनतेने बघितला आहे. तसेच सातारा जावळी तालुक्यांमध्ये ज्यांना ताकद आजमावायची आहे त्यांनी आजमावावी, असे प्रति आव्हान आमदार शशिकांत शिंदे यांना देखील दिले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, उदयनराजेंनी माझ्यावर बुद्धीची वाढ झाली नाही, असा आरोप केला आहे. मात्र लोकसभेची पोटनिवडणूक त्यांच्या बुद्धीच्या आविष्कारामुळे लागली. सातारा लोकसभा मतदारसंघात निवडून आले होते आणि चार महिन्यांतच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभा हातातून घालवून बसले आणि राज्यसभेला मागच्या दाराने जावे लागले. हा तर त्यांचा पराक्रम समजून आला आहे.
सातारा विकास आघाडीने साडेचार वर्षे नगरपालिका लुटून खायचा एकमेव कार्यक्रम केला आहे. पैसे काढण्यासाठी त्यांची अफाट बुद्धी वापरात आली. सातारच्या जनतेने पाच वर्षे सातत्यपूर्ण विकास व्हावा की चार महिन्यांच्या डायलॉगबाजीला महत्त्व द्यावे हे एकदाच ठरवून घ्यावे.
नगरपालिकेची निवडणूक आली की उदयनराजे आणि त्यांचे बगलबच्चे जुने रेकॉर्डिंग सुरू करतात. अजिंक्यतारा बँक ही बुडलेली नाही तरीही चुकीची माहिती पसरवली जाते. बँकेच्या एकाही सभासदाचे नुकसान होऊ दिले नाही. कर्मचाऱ्यांचे नुकसान झालेले नाही, जे ठेवीदार होते त्यांना बँक मर्ज झाल्याने सगळे पैसे परत मिळाले आहेत.
मात्र जिल्हा बँकेची निवडणूक लागली असताना स्वार्थ लक्षात घेऊन संचालक होण्यासाठी दिवाळीचे डबे घेऊन नेत्यांचे उंबरे उदयनराजेंनी झिजवले आहेत, अशी टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केली
माझ्यावर कुठलाही घरफोडीचा गुन्हा नाही...
घरफोड्या केल्याचा आरोप उदयनराजेंनी केला होता, त्याबाबत विचारले असता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मी कुणाचे घर फोडले हे त्यांनी दाखवून द्यावे. माझ्यावर कुठेही घरफोडी केल्याचा गुन्हा दाखल नाही. शाहूपुरी ग्रामपंचायत २० वर्षे उदयनराजे यांच्याकडे होती; मग त्या काळात शाहूपुरीला ते पाणी का देऊ शकले नाहीत? उलट सातारा शहराची हद्दवाढ उदयनराजेंच्या बगलबच्चांनी थांबवून ठेवली होती.