भाजप श्रेष्ठींनीे दोन अटी मान्य केल्यानेच उदयनराजेंचा प्रवेश; साताऱ्यात होणार पोटनिवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 03:11 AM2019-09-14T03:11:25+5:302019-09-14T06:39:47+5:30
राष्ट्रवादीला आणखी एक धक्का
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाला अखेर मुहूर्त सापडला आहे. भाजपश्रेष्ठींनी सर्व अटी मान्य केल्याने उदयनराजे दिल्लीत शनिवारी (दि. १४) पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
दिल्ली येथे होणाºया प्रवेश सोहळ्यात महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती असणार आहे. लोकसभा सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजेंना पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. ही पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत घेण्यात यावी, तसेच लोकसभेला दगाफटका झाल्यास राज्यसभेचे सदस्यत्व मिळावे, या दोन अटी उदयनराजेंनी भाजप श्रेष्ठींपुढे ठेवल्या होत्या, त्या मान्य झाल्याने उदयनराजेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
उदयनराजे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू होती. साताºयात उदयनराजेपे्रमींनी घेतलेल्या मेळाव्यात राजेंनी भाजपमध्ये जावे, अशी इच्छा अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. उदयनराजेंनी मात्र भाजप प्रवेशाबाबत कोणतेच जाहीर वक्तव्य केले नव्हते. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी साताºयात येऊन उदयनराजेंची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. पुण्यात खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उदयनराजेंना राष्ट्रवादीमध्ये थांबवून ठेवण्यात यश आल्याचे वृत्त पसरले होते. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे यांची मुत्सद्देगिरी फलदायी ठरल्याची चर्चाही सुरू होती; पण, उदयनराजेंनी या बैठकीतच पवारांचे आशीर्वाद घेऊन ‘साताºयाच्या विकासासाठी भाजपमध्ये जावेच लागेल,’ असे स्पष्ट केले होते.
विकास आघाडीचे सदस्य भाजपमध्ये
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा रविवार, दि. १५ रोजी साताºयात येणार आहे. यावेळी सातारा नगरपालिकेतील सत्ताधारी सातारा विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील उदयनराजे गटाचे सर्व सदस्य भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.