पक्षकार्याच्या धामधुमीत उदयनराजेंचे ‘पक्षी’कार्य!

By admin | Published: October 9, 2014 09:28 PM2014-10-09T21:28:08+5:302014-10-09T23:07:20+5:30

मांजाने जखमी झालेल्या ब्रह्मी घारीची शुश्रुषा

Udayanarajne's 'bird' work in the party! | पक्षकार्याच्या धामधुमीत उदयनराजेंचे ‘पक्षी’कार्य!

पक्षकार्याच्या धामधुमीत उदयनराजेंचे ‘पक्षी’कार्य!

Next

सातारा : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना आणि पक्षाच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी लागलेली असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांनी आज ‘पक्षी’कार्य केले. पतंगाच्या मांजात गुंतून पडलेल्या ब्रह्मी घारीला जीवदान देऊन तिची शुश्रुषा केली आणि तिला वन अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले.
सकाळी साडेअकराच्या सुमारास खासदार उदयनराजे प्रचारासाठी बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच ‘जलमंदिर पॅलेस’ या त्यांच्या निवासस्थानी छपरालगत ब्रह्मी घार अडकून पडल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तत्काळ कर्मचाऱ्यांना बोलावून त्या धडपडणाऱ्या घारीला खाली उतरविले. पतंगाच्या मांजात ती अडकली होती. त्या गुंत्यातून तिला सोडवून त्यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांना निरोप पाठविला. डॉक्टरांनी सुचविलेली औषधे जवळच्या जनावरांच्या औषधालयातून मागवून घेतली आणि उपचार पूर्ण झाल्यावर वन अधिकाऱ्यांना बोलावून घेतले.
सातारा क्षेत्राचे वनपाल सुनील भोसले आणि वनरक्षक दीपक गायकवाड यांनी जलमंदिर येथे जाऊन घारीला ताब्यात घेतले. आणखी उपचारांची गरज लक्षात घेऊन त्यांनी घारीला गोडोली येथील रोपवाटिकेत आणले. दुपारपर्यंत विश्रांती घेऊन घार ताजीतवानी झाली. तीनच्या सुमारास फोटोग्राफरला एक छानशी ‘पोझ’ दिल्यानंतर घार आकाशात झेपावली.
ब्रह्मी घार ही साध्या घारीपेक्षा थोडी वेगळी असून, तिचे धड शुभ्र पांढरे आणि पंख तपकिरी रंगाचे असतात. उंच झाडांवर राहणारी ब्रह्मी घार आकाशातही इतर पक्ष्यांपेक्षा जास्त उंच तरंगत राहते. मात्र, इतक्या उंच जाऊनही ती आपले भक्ष्य अचूक पकडते. (प्रतिनिधी)

Web Title: Udayanarajne's 'bird' work in the party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.