उद्धव ठाकरेंकडून सत्तेसाठी हिंदुत्वाचा त्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:51 AM2021-02-20T05:51:50+5:302021-02-20T05:51:50+5:30
सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपने हजारो गावांत अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. शिवगान हा ...
सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपने हजारो गावांत अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. शिवगान हा खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी मात्र सत्तेसाठी हिंदुत्वाचा केवढा मोठा त्याग केला,’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.’
येथील अंजिक्यतारा किल्ल्यावर खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी आमदार कांताताई नलावडे, सुनेशा शहा, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, भाजपचे सांस्कृतिक सेलचे पंकज चव्हाण, विठ्ठल बलशेठवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक धनंजय जांभळे, निलेश नलावडे, विक्रम बोराटे, सुनील काळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, ‘राज्यात सत्तेवर असलेल्या लोकांनी लोकशाही मोडीत काढून ठोकशाहीचे राज्य सुरू केलेले आहे. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन यांच्यावर कारवाई करणार म्हणतात. तुमच्या घरचं राज्य आहे काय? की कायद्याचं राज्य आहे. लोक मतदानाची वाट बघत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर जेवढी गाणी लिहिली गेली आहेत ती गाण्याची स्पर्धा प्रत्येक जिल्ह्यातील गावांत घेतली. जे पहिले आले त्यांची शुक्रवारी किल्ले अजिंक्यतारा येथे स्पर्धा होती. कोरोनाच्या नावाखाली या स्पर्धेला बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्यातल्या एका पक्षाचा राज्याचा अध्यक्ष हजारोंच्या संख्येने मिरवणूक काढतो, कोरोनाचे कारण सांगून राज्य सरकार अधिवेशन पुढे ढकलत आहे, खरे तर अधिवेशनात पूजा चव्हाणचा विषय निघणार आहे. धनंजय मुंढेचा विषय निघणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निघणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना पन्नास हजार देणार होते ते मिळाले नाहीत. ७० हजार वीज कनेक्शन तोडली जाणार आहेत. गावोगावी वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरू आहे. त्याला सरकारला सामोरे जायला भीती वाटते.’
शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्येच..कुठेही जाणार नाहीत
आम्ही सत्तेवर असताना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या २० ते २५ कोटींच्या निधीच्या फाइलीवर सह्या करायचो. आता ते होत नसल्याने आमच्या आमदारांना सत्ताधाऱ्यांना जाऊन भेटावं लागत आहे. शिवेंद्रसिंहराजे हे भाजपमध्ये आहेत. त्यांची राष्ट्रवादीची जवळीक वाढलेली नाही. भेटणे तर चालूच असते. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुड्याला गेले होते. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे, असे आ. पाटील यांनी स्पष्ट केले.