मायणी : अवकाळी पावसामुळे राज्यात मोजदाद न करता येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळेपर्यंत मी शेतकऱ्यांबरोबर आहे, अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.खटाव तालुक्यातील मायणी, कातरखटाव येते अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी ते शुक्रवारी तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. दुपारी तीन वाजता त्यांचे जिल्ह्यात आगमन झाले. त्यानंतर येथील बागायतदार शिवाजी शामराव देशमुख यांच्या द्र्राक्षबागेची पाहणी केली. त्यांच्याबरोबर खासदार अरविंद सावंत, नितीन बानुगडे-पाटील, आमदार महेश शिंदे, शेखर गोरे यांच्यासह जिल्हा व राज्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, ह्यसरकार स्थापन होईल न होईल, याचे मला काही देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द निवडणुकीदरम्यान दिला आहे, तो पूर्ण करणारच आहे. मी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येथे आलो आहे. यापूर्वी मी विदर्भ, मराठवाडा भागांमध्ये अवकाळीने झालेल्या नुकसानाची पाहणी केली आहे. प्रत्येक भागात वेगवेगळी पिके घेतली जातात. त्या पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करत नाही, तोपर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. त्यांच्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे.यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, खटावच्या तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस पाटील प्रशांत कोळी यांच्यासह महसूल, कृषी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.प्रत्येक भागात मदत केंद्रप्रत्येक भागातील शेतकऱ्यांची समस्या वेगळी असल्याने आम्ही प्रत्येक भागात मदत केंद्र उभे करणार आहे. याठिकाणी येऊन शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडव्यात, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.विमा कंपनीकडूनही फसवणूकअवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झालेले असतानाच विमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. खासगी विमा कंपनीकडूनही या भागातील ग्रामस्थांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
अवकाळीमुळे झालेले नुकसान मोजदाद न करता येणारे : उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 6:38 PM
अवकाळी पावसामुळे राज्यात मोजदाद न करता येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळेपर्यंत मी शेतकऱ्यांबरोबर आहे, अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.
ठळक मुद्देअवकाळीमुळे झालेले नुकसान मोजदाद न करता येणारे : उद्धव ठाकरेखटाव तालुक्यातील पिकांची पाहणी