पाण्याचा अपव्यय टाळा
सातारा : शहरात अनेक ठिकाणी सकाळी व सायंकाळच्या वेळेस घरगुती नळांना पाणी आल्यास नागरिक पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी करीत आहेत. डांबरी सडकेवर असलेल्या गाड्याही धूत आहेत. अशाप्रकारे पाण्याची नासाडी केली जात आहे.
वातावरणात बदल
सातारा : सध्या ग्रामीण भागासह शहरात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. दिवसा कडक उन्ह पडत असून, तर रात्रीच्या वेळी जास्त उकाडा निर्माण होत आहे. दिवसभर घरात राहून वैतागलेल्या अनेकांना या उकाड्याने हैराण केले आहे.
लिंबाची मागणी वाढली
सातारा : आरोग्यासाठी लाभदायक असणाऱ्या लिंबू सरबतची मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून मागणी केली जात आहे. परिणामी येथील बाजारपेठेत लिंबाची खरेदी-विक्री वाढली आहे. दहा रुपयांना चार ते पाच लिंबूंची विक्री विक्रेत्यांकडून होत आहे. घरात येणाऱ्या पाहुण्यांना लिंबू सरबत करण्यासाठी लिंबांची मागणी वाढली आहे.
दुकान पुढून बंद मागून सुरू
सातारा : कडक लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दुकानात भरलेला नाशवंत माल खपविण्यासाठी सध्या व्यावसायिक दुकानाच्या दारात बसू लागले आहेत. गल्लीबोळात हे प्रकार सर्रास पहायला मिळतात.