मातृभाषेच्या संवर्धनासाठी अविरत प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:14 AM2021-02-21T05:14:24+5:302021-02-21T05:14:24+5:30
मराठी ही आपली मातृभाषा आहे. या मातृभाषेचा गोडवा इतका आहे की, याची सर दुसऱ्या कोणत्याच भाषेला येणार नाही. सातारा ...
मराठी ही आपली मातृभाषा आहे. या मातृभाषेचा गोडवा इतका आहे की, याची सर दुसऱ्या कोणत्याच भाषेला येणार नाही. सातारा जिल्ह्यातील अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या मातृभाषेची महती सातासमुद्रापार पोहोचविली अन् अजूनही पोहोचवित आहेत. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय मातृभाषा संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अविरत प्रयत्न करीत आहे. मराठी चर्चासत्रापासून ते राजभाषा मराठी गौरव दिनानिमित्त विकिपीडिया नोंद लेखन कार्यशाळेपर्यंत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम हे महाविद्यालय राबवित आहे.
छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विभाग मराठी अभ्यास केंद्रात मातृभाषा मराठीच्या संवर्धनासाठी मराठी भाषा, साहित्य, समीक्षा, संशोधन व मराठी भाषिक कौशल्याचा विकास या संदर्भाने विविध उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात. याशिवाय शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि मराठी विभागादाद्वारे राष्ट्रीय कथाकथन व काव्यवाचन स्पर्धाचे आयोजन केले जाते. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मराठी हुमणे स्पर्धा, म्हणी संकलन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, कथा लेखन स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, मराठी घोषवाक्य अशा स्पर्धांचे आयोजन करून मातृभाषेला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.
याशिवाय भाषिक कौशल्य विकास कार्यशाळा, आम्ही पु. ल. देशपांडे स्टॅंडअप कॉमेडी स्पर्धा भरविल्या जातात. मातृभाषेची महती वाढावी यासाठी पटकथा लेखन कार्यशाळा, कथा निर्मिती व आस्वाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मराठीतून शैक्षणिक लेखन कसे करावे यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले जाते. याचबरोबर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केले जाणारे बंधुता विद्यार्थी–शिक्षक साहित्य संमेलन आज मातृभाषा संवर्धनाची चळवळ अधिक दृढ करीत आहे.
तसेच संगीत विभाग व मराठी विभाग यांच्यावतीने गीत गायन स्पर्धा, वाचन प्रेरणादिन असे उपक्रमही राबविले जातात. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सिद्धी विद्यामंदिर येथे जाऊन मुलांना मराठी गाणी व कला कौशल्य सादरीकरण केले. मातृभाषेचा गोडवा गाणारी ही परंपरा पुढेही कायम ठेवण्यात आली.
(कोट)
आंतरमहाविद्यालयीन मराठी वक्तृत्व स्पर्धा, मराठी भाषा व साहित्य संशोधन : पुनर्विचार व नव्या दिशा हे ऑनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, मराठीतून वक्तृत्व कला विकास आदी कार्यशाळा मातृभाषेला अधिक समृद्ध करीत आहे.
विद्यार्थ्यांना आणि समाजाला मराठी मातृभाषेचे विविध क्षेत्रात होणारे आविष्कार आणि त्याचे उपयोजन कसे करायचे यासाठी महाविद्यालय प्रयत्न करीत आहे. यामध्ये मराठी विभागातील विद्यार्थ्यांचे बौद्धिक सहकार्य मोलाचे ठरत आहे.
- डॉ. सुभाष वाघमारे,
मराठी विभागप्रमुख, छत्रपती शिवाजी महाविद्यालय.