७0 लाखांच्या ठेक्यांना विनाचर्चा मंजुरी
By admin | Published: September 10, 2014 10:07 PM2014-09-10T22:07:01+5:302014-09-11T00:14:41+5:30
सातारा पालिका सभा : २0 मिनिटांत १३ विषय मंजूर
सातारा : पालिकेची अनंत चतुर्दशी विशेष सभा झाली. या सभेत सात रस्त्यांच्या कामांसह स्वच्छतेच्या ठेक्यांना मंजुरी देण्यात आली. अवघ्या २0 मिनिटांत ही सभा उरकली.
नगराध्यक्ष सचिन सारस यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या सभागृहात ही सभा झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत घाईगडबडीने अनंत चतुर्दशीला ही सभा बोलावली होती.
तीन कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी शहरातील १0 प्रभागांतील गटारे, नाले स्वच्छ करणे व मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते दैनंदिन स्वच्छ करणे, निघणारा गाळ, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ पालिकेच्या कचरा गाडीत भरुन देणे हे विषय मंजूर करण्यात आले. १.१ घनमीटर क्षमतेच्या लोखंडी कचरा कुंड्या खरेदी केल्या आहेत. त्याला कार्योत्तर मंजुरी घेण्यात आली.
१३ व्या वित्त आयोगाचे शिफारशीने प्राप्त अनुदानातून घ्यावयाच्या कामांना व मल्हार पेठेत पार्किंग विकसित करण्याच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, मंगळवार तळ्यावर नगरसेवक अविनाश कदम यांच्या प्रयत्नातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे परिसरातील गुन्हेगारी कमी होईल. शहरातील संवेदनशील ठिकाणी असे कॅमेरे बसविण्याची गरज असल्याचे मत नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. ‘मनुष्य कधी-कधी प्राण्यासारखा वागतो. लपून-चोरुन असे गुन्हे होतात. ज्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत, तेथील क्राईम रेट कमी झाल्याचे दिसून येते. अविनाश कदम हे एका आघाडीचे पक्षप्रतोद आहेत, त्यामुळे त्यांनी संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रयत्न करावेत,’ अशी मागणी यावेळी पालिकेचे विरोधी पक्षनेते अॅड. बाळासाहेब बाबर यांनी केली. (प्रतिनिधी)
४0 कॅमेऱ्यांचा राहणार पहारा
मंगळवार तळे परिसरात ४० सीसीटीव्ही कॅमेरे आणि १८ डीव्हीआर बसवण्यात आले आहेत. ही सर्व यंत्रणा वायरलेस पध्दतीने पोलीस ठाण्याच्या मंगळवार पोलीस चौकीशी जोडण्यात आली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते याचे उदघाटन झाले. यावेळी नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्षा दिनाज शेख, नगरसेवक अविनाश कदम, मुक्ता लेवे, दीपलक्ष्मी नाईक, हेमा तपासे उपस्थित होते. सातारा शहरातील सर्व प्रमुख स्थळांवर ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.