उरूलमध्ये दोन बिबट्यांचा रस्त्याकडेला तासभर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:00 PM2017-12-17T23:00:03+5:302017-12-17T23:04:26+5:30

 In the Urul, two leopards should stay on the road for an hour | उरूलमध्ये दोन बिबट्यांचा रस्त्याकडेला तासभर ठिय्या

उरूलमध्ये दोन बिबट्यांचा रस्त्याकडेला तासभर ठिय्या

Next


मल्हारपेठ/पाटण : नवारस्ता ते उंब्रज मार्गावरील उरुल घाटात रस्त्याकडेलाच दोन बिबट्यांनी तासभर ठिय्या मांडला. अवघ्या पन्नास फुटांवर बसलेले दोन बिबटे पाहण्यासाठी यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. वाहनेही जागच्या जागी थांबली. मात्र, तरीही ते बिबटे जागचे हलले नाहीत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उरूल परिसरात गत अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे. अनेकवेळा शिवारात त्याचे दर्शनही ग्रामस्थांना झाले आहे. काही महिन्यांपूर्वी जीपमधून निघालेल्या युवकांनाही बिबट्या दृष्टीस पडला होता. जीपसमोरूनच त्याने रस्ताही ओलांडला होता. त्यावेळी बिबट्याचा या परिसरातील वावर अधोरेखित झाला. दरम्यान, रविवारी सायंकाळी उरूल घाटातील वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू असताना घाटातील बिबवीच्या वळणावर दोन बिबट्या बसले असल्याचे महेश निकम व अमीर मुलाणी या दोन युवकांनी पाहिले.
महेश व अमीर हे मित्रांसमवेत उरूलला निघाले होते. त्यावेळी वळणावर रस्त्यापासून अवघ्या पन्नास फूट अंतरावरती झाडाखाली दोन बिबट्या बसल्याचे त्यांनी पाहिले. बिबट्या पाहताच त्यांनी सुरक्षित अंतरावर धाव घेतली. तसेच येणा-जाणाºयांनाही त्यांनी याबाबत सांगितले. घाटात बिबट्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थही धावले. यावेळी रस्त्यावरून जाणारे प्रत्येक वाहन त्याठिकाणी थांबत होते. तसेच ग्रामस्थांचीही गर्दी झाली होती. मात्र, तासभर दोन्ही बिबटे एकाच जागी बसून होते. त्यांनी कसलीही हालचाल केली नाही. तसेच बघ्यांची गर्दी असतानाही ते आक्रमक झाले नाहीत.
दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारीही त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते धडपड करीत होते. तसेच बिबट्या तेथून कोणत्या दिशेला जातायत, याची ते पाहणी करीत होते. सुमारे तासाभरानंतर दोन्ही बिबटे तेथून नजीकच्या झाडीत निघून गेले. त्यानंतर काही वेळांत बघ्यांची गर्दीही ओसरली. रहदारीच्या ठिकाणी तासभर बिबट्या थांबल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
मृत जनावरांसाठी बिबट्या घाटात
उरूल घाटात वारंवार मृत जनावरे टाकली जातात. त्यामुळे त्याठिकाणी बिबट्याचा वावर असतो. रविवारीही ज्याठिकाणी मृत जनावरे टाकतात त्याचठिकाणी बिबट्या ठाण मांडून होता. त्याठिकाणी कोणतेही जनावर टाकले नसताना त्याने मांडलेला ठिय्या अनेकांसाठी आश्चर्याची बाब होती. ग्रामस्थ तसेच प्रवाशांना बिबट्या दिसताच त्याला पाहण्यासाठी गर्दी करू नये. तसेच त्याला हुसकावण्याचाही प्रयत्न करू नये, अशी सूचना वन विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title:  In the Urul, two leopards should stay on the road for an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.