करणीच्या नावाखाली फोटोंचा वापर अंधश्रद्धेला खतपाणी : अमावस्येला लिंबू, मिरचीचा उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 01:04 AM2018-06-15T01:04:14+5:302018-06-15T01:04:14+5:30
एकविसाव्या शतकात आजही अंधश्रद्धेला खतपाणी मिळत आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे अमावस्येला ठिकठिकाणी आजही लिंबू, मिरचीचा उतारा पाहायला मिळत असतोे.
जावेद खान।
सातारा : एकविसाव्या शतकात आजही अंधश्रद्धेला खतपाणी मिळत आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे अमावस्येला ठिकठिकाणी आजही लिंबू, मिरचीचा उतारा पाहायला मिळत असतोे. मात्र साताऱ्यात नुकत्याच झालेल्या अमावस्येला येथील कृष्णा पुलाच्या खाली करणीच्या नावाखाली लिंबू अन् नारळाबरोबर काही फोटोही अर्धवट जळालेल्या स्थितीत पाहून नागरिकांमध्ये दिवसभर उलट सुलट चर्चा सुरू होती.
बुधवारच्या मध्यरात्री अमावस्या संपल्यानंतर सकाळी या ठिकाणी काही व्यावसायिक गाडी लावत असताना या उताºयावर नजर पडली असता आपल्या व्यवसायावर कोणीतरी करणी करत असल्याची समज करून त्याने मोठमोठ्याने शिवीगाळ करत गोंधळ एकच घातला होता.
यानंतर करणी कशी असते, हे पाहण्यासाठी अंधश्रद्धेला खतपाणी न घालणाºया एका व्यक्तीने या उताºयाची टोपली उचकटून पाहिली असता त्यामध्ये सदर बझार येथील एका कुटुंबीयातील सदस्यांची अर्धवट जळालेली फोटो आढळून आले. बाँबे रेस्टॉरंट येथील कृष्णा पुलाखाली एका कोपºयात या करणीच्या नावाखाली पाटी ठेवण्यात आली होती. यामध्ये २० ते २५ लिंबू, पाच-सहा नारळे, खिळे, टाचण्या, घोड्याची नाल, चार-पाच काळ्या बाहुल्या, बुक्की, भंडारा, जळालेली कपडे आदी वस्तूंचा यात समावेश करून एका मडक्यात या कुटुंबीयाच्या सदस्यांचे फोटो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा प्रकार पाहून अनेकांनी लांबूनच रामराम ठोकला, तर काहीजण अंधश्रद्धेचा हा भाग असल्याचे समजावून सांगत होते.
दरम्यान, या मडक्यात अर्धवट जळालेले फोटो पाहून याबाबतची माहिती एका वाहनचालकाने संबंधित कुटुंब प्रमुखाला दिली असता ते तातडीने त्या ठिकाणी येऊन पाहिले. त्यांनीही अंधश्रद्धा असल्याचे सांगत त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु या मडक्यात घरातील काही महिला सदस्यांचे फोटोही सुया टोचून ठेवल्याचे सापडले. कुटुंबीयाने ही बाब गांभीर्याने घेऊन जो कोणी हे कृत्य करत असेल त्याच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा नोंदवणार असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अंधश्रद्धेच्या नावाखाली आजही अनेक भोळ्या भाबड्या लोकांना लुटले जात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या सातारा जिल्ह्यात आजही अमावस्येला लिंबू-मिरचीचा उतारा विकणारे रस्त्यावर विक्री करताना दिसत आहेत. समाजप्रबोधन करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहेत.
कपडे अन् फोटो
आले कुठून
घरात वापरण्यात येत असलेल्या काही कपड्यांची तुकडे तर मोबाईलवरून काढलेले फोटोही सापडल्याने हे फोटो व कपडे या ठिकाणी कोणी आणले असावेत, असा प्रश्न उपस्थितांमधून होत होता. हा अंधश्रद्धेचा भाग असला तरी घरातील कपडे व फोटो जवळच्या व्यक्तीचे हे कृत्य असल्याची शक्यता कुटुंब प्रमुखांनी वर्तवली आहे.
आमच्या कुटुंबीयाचे फोटो असल्याची माहिती मिळाली, नेमका काय प्रकार आहे, हे पाहायला या ठिकाणी आलो असता, घरातील पुरुष सदस्यांबरोबर महिलांचेही या ठिकाणी फोटो मिळाले. यामुळे याची गंभीर दखल घेऊन संबंधितावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा नोंद करणार आहे.
- चेतन सोळंखी