सातारा : लसीकरणात निर्माण होणाऱ्या अडथळ्यांची शर्यत पार करीत सातारा जिल्ह्याने लसीकरणात साडेसहा लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल ६ लाख ८७ हजार ६०४ नागरिकांनी कोरोना लस घेतली आहे. लस वेळेत व पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यास ही मोहीम अधिक गतीने पूर्ण होऊ शकते.
राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने राज्य शासनाने उपाययोजनांची तीव्रतादेखील गतिमान केली आहे. हे करीत असतानाच राज्यभरात लसीकरणाचा वेगही वाढविला आहे. दि. १ मार्चपासून सर्वत्र कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, सातारा जिल्ह्यातील सरकारी ११८, तर खासगी १० रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम राबविली जात आहे.
प्रारंभी ६० वर्षांवरील नागरिकांना लस दिली जात होती. त्यानंतर ४५ ते ६० वर्षांपर्यंतच्या कॉमॉर्बिड व इतर सर्व नागरिकांना लस उपलब्ध करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल सहा लाख ८७ हजार ६०४ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून, यामध्ये पाच लाख ८५ हजार १५७ नागरिकांनी लसीचा पहिला, तर एक लाख दोन हजार ४४७ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
(चौकट)
शासकीय रुग्णालय यांना प्राधान्य
सद्य:स्थितीला जिल्हा, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र मिळून एकूण ११७ शासकीय; तर विविध १० खासगी रुग्णालयांत लसीकरणाची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. खासगीमध्ये लसीसाठी पैसे मोजावे लागत असल्याने नागरिक शासकीय रुग्णालयांनाच प्राधान्य देत आहेत. शासकीय रुग्णालयात लसीसाठी दिवसभर रांगा लागत आहेत.
(चौकट)
आता मिळणार लस
लसीचा तुटवडा भासू लागल्याने राज्य शासनाने १८ ते ४५ वर्षांपर्यंतच्या नागरिकांचे लसीकरण तूर्त थांबविले आहे. शासनाने ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णालयात लसीसाठी लागणाऱ्या रांगा आता कमी होणार असून, ४० वर्षांवरील नागरिकांना लस उपलब्ध होणार आहे.
(चौकट)
लसीकरणाचा लेखाजोखा
एकूण लसीकरण : ६,८७,६०४
पुरुष : ३,०२,२५१
महिला : २,८२,८५३
इतर : ५५
पहिला डोस : ५,८५,१५७
दुसरा डोस : १,०२,४४७
(चौकट)
वयोगटानुसार लसीकरण
६० वर्षांवरील : २,४९,८८३
४५ ते ६० : २,६७,१७९
३० ते ४५ : ४७,४१२
१८ ते ३० : २०,७००