नागठाणे : दोन भरधाव कारच्या धडकेमध्ये चार दुचाकीवरील एकजण ठार तर पाचजण गंभीर जखमी झाले. या दोन्ही अपघातांचा थरार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वळसे आणि खोडद ता. सातारा येथे शुक्रवारी सकाळी आणि सायंकाळी घडला.वळसेतील अपघातामध्ये राजेंद्र हणमंत घाडगे (वय ४८, रा. समर्थगाव, ता. सातारा) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर कुमार माणिक पोतदार (रा. सासपडे, ता. सातारा), अमर पानसकर (रा. मल्हार पेठ,ता. पाटण) हे दोघे गंभीर जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी, वरील संशयित तिघे तीन दुचाकीवरून साताऱ्याकडे येत होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव कार येत होती. वळसे येथे आल्यानंतर कारने ( एमएच ११ डब्लू ३०२) तिन्ही दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, त्यातील एक दुचाकीस्वार महामार्गावरून थेट सुमारे २५ फूट खाली असलेल्या सेवारस्त्यावर जाऊन कोसळला. अपघातात अन्य दोन दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालकाने कार घटनास्थळी सोडून पलायन केले. या अपघातात तिन्ही दुचाकींचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.
अपघातात महामार्गावरुन सेवारस्त्यावर कोसळलेले राजेंद्र घाडगे यांचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. घाडगे हे जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक म्हणून कार्यरत होते. घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याच्या सहायक उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर यांच्यासह हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळावरून पलायन केलेल्या कार चालक अभय बाळकृष्ण पाटील (रा.कार्वेनाका कºहाड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक बराचवेळ ठप्प झाली होती. त्यावेळी अब्दुल सुतार, अजीम सुतार, सुहेल सुतार यांनी क्रेनच्या आणि बोरगाव पोलिसांच्या सहकाऱ्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.दरम्यान, दुसरा अपघात खोडद फाटा, ता. सातारा येथे झाला. एक दुचाकीस्वार महामार्ग ओलांडत असताना भरधाव कारने( क्र.एम एच १० ए एन २७७२ ) त्यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर ही कार महामार्गालगतच्या हॉटेल समोर उभ्या असलेल्या मालट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले तर एक किरकोळ जखमी झाला. जखमींना खासगी दवाखान्यात नेण्यात आले आहे.