सातारा - खासदार उदयनराजे भोसले हे नेहमीच आपल्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असतात. कधी शेतकऱ्याच्या बांधावर गप्पा मारत बसतील, तर कधी कार्यकर्त्याच्या दुचाकीवरुन फेरफटका मारतली. कधी प्रचाराला गेल्या आजीबाईचा मुका घेतील, तर कधी भर सभेत कार्यकर्त्यांना आय लव्ह यू म्हणतील. उदयनराजेंची हीच अदा तरुणाला आवडते. आताही, साताऱ्यातील एका कार्यक्रमात उदयनराजेंनी चक्क गाणं म्हणून कार्यकर्त्यांवरील प्रेम व्यक्त केलं आहे. हमे तुमसे प्यार कितना... ये हम नही जानते... हे गाणंच चक्क स्टेजवरुन उदयनराजेंनी म्हटलं आहे.
साताऱ्यातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार कार्यक्रमात भाषण करताना उदयनराजेंनी पत्रकार आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम व्यक्त केलं. श्वासात श्वास आहे, तोपर्यंत तुमच्यासाठीच जगणार आहे. तुमच्यावर अपार प्रेम करणार आहे. तुमच्यावर शब्दातीत प्रेम आहे हे शपथेवर सांगतो. माझ्यात कसलाही बदल होणार नाही. फक्त तुम्ही तुमच्यात बदल करु नका. काय कमवायचं आणि काय गमवायचं? आयुष्यातील बरीच वर्षे निघून गेली. हाफ चड्डीतले दिवस निघून गेले. कॉलेजला असताना दांड्या मारायचो पण कमवली ती मैत्री. एकयं, अवलियापण असल्याशिवाय खर्या अर्थाने मजा येत नाही, असं म्हणत आपल्यातील खोडकरपणा जिवंत ठेवण्याचा सल्लाच उदयनराजेंनी दिला. त्यानंतर, भाषण ऐकून तुम्ही कंटाळला असाल तर गाणं ऐकायचं का, असा सवालच त्यांनी जाहीर कार्यक्रमात विचारला. त्यानंतर, कार्यकर्ते आणि उपस्थितांकडून हो असा सूर येताच, उदयनराजेंनी गाणं म्हणायला सुरुवात केली.
थोडा आवाज बसलेलाय असे म्हणत त्यांनी गाणं म्हणायला सुरुवात केली. हमे तुमसे प्यार ए कितना, हम नही जानते... मगर जी नही सकते तुम्हाला बिना....कोई तुमसे भी.. कोई तुमसे... हे म्हटल्यानंतर उदयनराजेंना गाण्याचे बोल आठवले नाहीत. त्यामुळे नं नं ना... नं... असे म्हणत त्यांनी आपलं गाणं सुरू ठेवलं. उदयनराजेंच्या या गाण्याला टाळ्या आणि शिट्टया वाजवून उपस्थितांनी दाद दिली.
पाहा व्हिडीओ-