सातारा - गेल्या पाच वर्षात सातारा नगरपालिकेची सत्ता खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे असताना ते विकास करण्यात अपयशी ठरले आहेत. हे अपयश लपविण्यासाठी त्यांनी पोस्टरबाजी आणि दुचाकीवर जाऊन नौटंकी सुरु केल्याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली होती. त्याला उत्तर देताना खासदार उदयनराजे भोसले यांनी आम्ही दुचाकीवर जाऊ नाहीतर रांगत, गडगडत, लोळत जाऊ ज्यांना कामे करायचीच नाहीत त्यांनी आमच्यावर टीका करु नये. हिंमत असेल तर समोर येऊन बोलावे असा इशारा दिला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सध्या या दोन्ही राजेंमध्ये चांगलीच जुंपली आहे.
सातारा शहरात उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा विकास आघाडी आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली नगर विकास आघाडी काम करत आहे. सध्या पालिकेत सातारा विकास आघाडीची सत्ता असून गेल्या पाच वर्षात या आघाडीने आणि खासदारांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत असा आरोप शिवेंद्रसिंहराजे यांनी मंगळवारी केला होता. विकासकामे न करता केवळ दुचाकीवरुन जाणे आणि पोस्टबाजी करणे अशी नौटंकी सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली होती. साताऱ्याच्या विकासाच्या अनेक गप्पा मारल्या काही स्वप्ने रंगवली पण सातारकरांचा स्वप्नभंगच झाला असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले होते.
याबाबत प्रतापगड येथे पुजेसाठी गेलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांना विचारले असता, त्यांनी आपल्या पद्धतीनेच याला उत्तर दिले. ते म्हणाले, होय, मला चारचारी परवडत नाही म्हणून गेलो दुचाकीवर त्याला काय झाले. मी दोन चाकीच नाही तर चालत फिरेन, रांगत फिरेन, माझे गुडघे दुखतात मी लोळत फिरेन. एखादा नवस फेडण्यासाठी जसे लोटांगण घालतात तसे फिरेन. त्यांनी पण फिरावे. त्यांना कोणी रोखले आहे का...लोकशाही आहे. तुम्ही सीटवर उभे राहून फिरा किंवा डोक्यावर उभे राहून फिरा. हिंमत असेल तर समोर या मग बघू अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
याला उत्तर देताना शिवेंद्रसिंहाराजे भोसले म्हणाले, तुम्ही कसेही लोळा, रांगत जा पण नगरपालिकेला लोळवू नका. विकास कामे न करता केवळ पोस्टरबाजी करणे आणि दुचाकीवरुन फिरणे ही नौटंकी आहे. त्यावर मी आजही ठाम आहे. खासदारांना पेट्रोल परवडत नाही असे म्हणणे सगळ्यांसाठीच आश्चर्याचे आहे. त्यांना ८० लाखांची बीएमडब्ल्यू घ्यायला परवडते आणि पेट्रोल परवडत नाही, मग त्यात काय टाकून फिरणार असा सवालही त्यांनी केला.
सातारकरांसाठी करमणुकीचा विषय
नगरपालिकेच्या पाच वर्षाच्या काळात काहीही कामे केली नाहीत. कोरोनाच्या काळातही नगरपालिका स्वस्त बसली होती. हे सातारकरांनी पाहिले आहे. ते नेहमी समोरासमोर या म्हणतात...पण समोर आल्यावर त्यांची भूमिका वेगळी असते. त्यामुळे त्याला काहीच अर्थ असत नाही. ही त्यांची फक्त वेळ मारुन नेण्याचा प्रकार आहे. नगरपालिका निवडणूक आली की दोन्ही राजेंमध्ये वाद होतात. हे सातारकरांसाठी आता नवीन राहिलेले नाही. त्यामुळे दोन्ही राजेंमधील वाद हा आता सातारकरांसाठी करमणुकीचा विषय झाला आहे.
ईडीबद्दल काय म्हणाले उदयनराजे
जसे आपण पेरतो तसेच उगवतो. आमच्या मागे ईडी नाही. ज्यांनी वाईट केले आहे त्यांच्याच मागे का लागले आहेत. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावे. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन, असे सांगत ईडी कारवाईंच्या मागे भाजप असल्याच्या आरोपांबाबत विचारले असता, कोणीही असू दे मी सर्वांची यादी देतो. एकमेकांचे झाकायचे आणि सोयीप्रमाणे एकमेकांचे काढत बसायचे. बास झाले आता राजकारण, असे उदयनराजे यांनी ठणकावले.