मळे, कोळणे, पाथरपुंजचे ग्रामस्थ करणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:39 AM2021-01-23T04:39:48+5:302021-01-23T04:39:48+5:30

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत पाटण तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ ठिकाणी वसलेल्या आणि चांदोली अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात येणाऱ्या मळे, कोळणे व ...

Villagers of Malle, Kolane, Patharpunj will agitate | मळे, कोळणे, पाथरपुंजचे ग्रामस्थ करणार आंदोलन

मळे, कोळणे, पाथरपुंजचे ग्रामस्थ करणार आंदोलन

googlenewsNext

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत पाटण तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ ठिकाणी वसलेल्या आणि चांदोली अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात येणाऱ्या मळे, कोळणे व पाथरपुंज या तिन्ही गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न १९८५ सालापासून प्रलंबित आहे. ५ जानेवारी २०१० रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची घोषणा झाली. चांदोली राष्ट्रीय उद्यान घोषित केले. १९९३ साली या तिन्ही गावांचा समावेश चांदोली अभयारण्यात झाल्याचे स्थानिकांना समजले. त्यानंतर २०१६ साली गाभा क्षेत्रात ही गावे समाविष्ट झाली. या तिन्ही गावांत मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. दरवर्षी पुनर्वसनाच्या कामासाठी प्रत्येक जून महिन्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येते आणि दिवाळीनंतर पुन्हा प्रकल्पग्रस्तांकडे दुर्लक्ष केले जाते.

पुनर्वसनासाठी ओसाड, माळरान आणि खडकाळ जमिनी वनविभागाकडून या ग्रामस्थांना दाखविल्या जातात आणि प्रकल्पग्रस्त जमिनी स्वीकारत नसल्याचा कांगावा केला जातो. येथील ग्रामस्थांना शासकीय योजनांचा लाभ मिळतो. मात्र गाभा क्षेत्राचे कारण देत वनविभागाकडून ती कामे करण्यात आडकाठी केली जाते. मळे, कोळणे व पाथरपुंज या गावातील काही प्रकल्पग्रस्तांनी जागा पसंत केल्या आहेत. तेथील जमिनीचे क्षेत्र कमी असल्याने सरसकट पुनर्वसन होऊ शकत नाही. तेथील ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव देत नाही, तर दुसरीकडे गावाने पसंत केलेल्या जमिनीसाठी शासन ग्रामसभेचे ठराव मागत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत.

- चौकट

तिन्ही गावातील ग्रामस्थांच्या मागण्या

१) तिन्ही गावांच्या पुनर्वसनासाठी बाधितांना पसंत असलेल्या जमिनी तत्काळ देऊन ठराव व हरकतीही शासनाने घ्याव्यात.

२) संकलन यादीतील सर्व त्रुटी व दुरुस्ती यंत्रणेने आंदोलनस्थळी कराव्यात. ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या मुला-मुलींना स्वतंत्र लाभार्थी म्हणून नव्याने संकलन यादीत घ्यावे.

३) डिसेंबर २०२० पर्यंत ग्रामपंचायत दप्तरी व तलाठी कार्यालयात असलेल्या सर्व नोंदी ग्राह्य मानून संकलनाची पुरवणी यादी तत्काळ तयार करावी.

४) प्रकल्पबाधितांना बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा. तिन्ही गावातील शिल्लक राहिलेल्या खातेदारांचे मूल्यांकन करावे.

- कोट

घटनेने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येक नागरिकाला नागरी सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्या मागूनही मिळत नसतील तर असले उपेक्षित आणि वंचिताचे जगणे जगण्यापेक्षा राज्याच्या राज्यपालांनी आमचे रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदानकार्ड स्वीकारून नागरिकत्वच रद्द करावे.

- संजय पवार, प्रकल्पग्रस्त

Web Title: Villagers of Malle, Kolane, Patharpunj will agitate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.